यंदा सरासरीपेक्षा कमी मॉन्सून: स्कायमेट

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मार्च 2017

स्कायमेटच्या अंदाजानुसार या वर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्‍यता शून्य आहे. याचबरोबर, दीर्घकालीन सरासरीच्या (लॉंग पिरियड ऍव्हरेज) 90% पेक्षा कमी पाऊस झाल्यास देशात दुष्काळ पडण्याची शक्‍यताही सुमारे 15% इतकी असल्याचेही स्कायमेटने म्हटले आहे

नवी दिल्ली - भारतामधील यंदाच्या पावसाचे (मॉन्सून) प्रमाण सरासरीपेक्षा कमी (95%) असेल, असा अंदाज स्कायमेट वेदर या प्रसिद्ध संस्थेने व्यक्त केला आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार या वर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्‍यता शून्य आहे. याचबरोबर, दीर्घकालीन सरासरीच्या (लॉंग पिरियड ऍव्हरेज) 90% पेक्षा कमी पाऊस झाल्यास देशात दुष्काळ पडण्याची शक्‍यताही सुमारे 15% इतकी असल्याचेही स्कायमेटने म्हटले आहे. मॉन्सूनच्या चार महिन्यांपैकी जून जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांत सरासरीपेक्षा 30% कमी पाऊस होण्याचीही शक्‍यता आहे.

ईशान्य भारतामध्ये सध्या सुरु असलेला मॉन्सूनपूर्व पाऊस सुरुच राहिल; शिवाय त्याची तीव्रताही वाढेल, अशी शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि सिक्कीम या राज्यांमध्ये मॉन्सूनपूर्व पावसाचा प्रभाव दिसून आला आहे. भारतामध्ये मार्च महिन्यामध्येच असह्य उकाडा जाणवू लागला असून या पार्श्‍वभूमीवर स्कायमेटचा हा अंदाज अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.

गेल्या सहा-सात वर्षांपासून मॉन्सूनच्या आगमनावर ‘अल निनो’चा प्रभाव राहिला अाहे. परिणामी, मॉन्सूनचे सरासरी वेळापत्रक नेहमीच प्रभावित होत आले. महाराष्ट्रासह देशातही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने गेली चार वर्षे सतत दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. पावसाने सरासरी गाठली जरी, तरी वेळापत्रकच बिघडल्याने पिकांचे उत्पादन अशाश्‍वत झाले आहे. पावसाच्या मोठ-मोठ्या खंडाने तर शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले. यंदा मात्र, तूर्त अल निनोचा प्रभाव जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर काळात राहणार नसल्याने पाऊसकाळ सुरळित पार पडण्याची आशा निर्माण झाली अाहे.

भारताच्या एकूण वार्षिक पावसात ७० टक्के वाटा हा एकट्या मॉन्सून (नैर्ऋत्य मोसमी वारे) अाहे. देशातील २६३ दशलक्ष शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि त्यांची पिके हे या मॉन्सूनवरच अवलंबून असतात.

Web Title: Skymet Weather forecasts below normal Monsoon in 2017