'मसूदने दिली होती एका झापडीत सगळी गोपनीय माहिती'

'मसूदने दिली होती एका झापडीत सगळी गोपनीय माहिती'

नवी दिल्ली : भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार असलेला दहशतवादी मसूद अझर याने भारतीय जवानाची एक थप्पड बसताच थरथरत सर्व माहिती उगाळून टाकली होती, असा दावा सिक्कीमचे माजी पोलिस महासंचालक अविनाश मोहनानेय यांनी केला आहे. मसूदला 1994 मध्ये अटक झाली होती, त्या वेळी काश्‍मीर विभागाचे प्रमुख असलेल्या मोहनानेय यांनी त्याची चौकशी केली होती. 

पुलवामामध्ये हल्ला केलेल्या जैशे महंमद या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेचा मसूद हा प्रमुख आहे. पोर्तुगालच्या पारपत्राचा वापर करून बांगलादेशमार्गे भारतात घुसलेल्या मसूद अझरला फेब्रुवारी 1994 मध्ये दक्षिण काश्‍मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात अटक करण्यात आली होती. त्या वेळी तपास संस्थांच्या कोठडीत असलेल्या मसूदकडून माहिती मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांना फारसे कष्ट पडले नाहीत. मोहनानेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोठडीत असताना लष्कराच्या एका जवानाने मसूदला एकच थप्पड लगावल्यानंतर त्याने भराभर त्याच्या हालचालींची सर्व माहिती देऊन टाकली होती. पाकिस्तानातून काम करणाऱ्या दहशतवादी संघटनांची कार्यपद्धती त्याने सविस्तरपणे सांगितली होती. नंतर 1999 मध्ये विमान अपहरणानंतर प्रवाशांच्या बदल्यात त्याला तत्कालीन भाजप सरकारने सोडून दिल्यानंतर मसूद अझरने जैशे महंमदची स्थापना केली आणि भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले. संसदेवरील हल्ला, पठाणकोटमधील हवाई तळावरील हल्ला, उरी आणि इतर ठिकाणच्या लष्करी तळांवरील हल्ला आणि नुकताच झालेला पुलवामामधील हल्ला हे सर्व जैशे महंमदनेच केले आहेत. 

मसूदने दिली होती गोपनीय माहिती 
मोहनानेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेत असताना मसूदने बरीच गोपनीय माहिती भारतीय तपास संस्थांना दिली होती. छुप्या युद्धाची नुकतीच सुरवात होऊन ते समजून घेण्याचा भारताचा प्रयत्न असताना मसूदने पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना, त्यांचे कार्य, भरती प्रक्रिया यांची सविस्तर माहिती दिली होती. मसूदला तुरुंगात अनेक वेळा चौकशीसाठी भेटलो होतो आणि त्याच्याकडून माहिती काढून घेण्यासाठी कधीही बळाचा वापर करावा लागला नाही, कारण तो तातडीने माहिती पुरवित होता, असे मोहनानेय यांनी सांगितले. अफगाण दहशतवादी काश्‍मीर खोऱ्यात कसे घुसविले, हरकत उल मुजाहिदीन आणि हरकत उल जिहादे इस्लामी या संघटना एक करून हरकत उल अन्सार ही संघटना कशी तयार केली, याबाबतही माहिती त्याने दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com