सापाला कडकडून चावला अन् संपलच...

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जुलै 2019

साप त्यांच्याकडे येत होता पण ते घाबरले नाहीत. जागेवरच उभे राहिले अन् सापाने पकडले. सापाने त्यांना दंश केला मग ते चिडले. त्यांनीही चापाचा कडकडून चावा घेतला.

अहमदाबादः साप त्यांच्याकडे येत होता पण ते घाबरले नाहीत. जागेवरच उभे राहिले अन् सापाने पकडले. सापाने त्यांना दंश केला मग ते चिडले. त्यांनीही चापाचा कडकडून चावा घेतला अन् दोघांनीही जगाचा निरोप घेतला. गुजरातमधील महिसागर जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

सतरामपूर तालुक्यातील अजनवा गावात ही घटना घडली असून, पर्वत गाला बारीया (वय 60) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ग्रामस्थ व सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पर्वत हे शेतातील वाळलेले गवत ट्रकमध्ये भरण्याचे काम करत होते. गवातामधून अचानक साप बाहेर आला. सापाला पाहिल्यानंतर तेथे उपस्थित असलेले बाजूला पळाले. मात्र, पर्वत जागेवरून हाललेच नाहीत. मी, यापूर्वीही साप पकडले आहेत, असे सांगत तेथेच उभे राहिले आणि सापाला पकडले. परंतु, सापाने त्यांच्या हाताला आणि चेहऱ्याला दंश केला. सापाने केलेल्या दंशामुळे पर्वत चिडले आणि सापाचा कडकडून चावा घेतला. काही वेळातच सापाचा मृत्यू झाला.'

दरम्यान, पर्वत यांना उपचारासाठी प्रथम लुनवाडा व गोध्रा येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, सापाचे विष शरीरात पसरल्याने पर्वत यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अजनवा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Snake Bites Man and Man Bites snake at gujrat