गुजरातसमोर पाण्याचे संकट

महेश शहा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

नर्मदा धरणातून चार राज्यांना पाणी दिले जाते. नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाने 2017-18 या वर्षासाठी केलेल्या पाणीवाटपात गुजरातचा पाण्याचा वाटा केवळ 4.71 दशलक्ष फूट आहे. मध्य प्रदेशचा 9.55, महाराष्ट्राचा 0.13 तर राजस्थानचा 0.26 दशलक्ष फूट पाण्याचा वाटा आहे. गेल्या 15 वर्षांत मागील वर्षी नर्मादेच्या पाणलोट क्षेत्रांत सर्वांत कमी पाऊस झाला. त्यातही मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या पाणलोट क्षेत्रात खूपच कमी पाऊस झाला

अहमदाबाद - नर्मदा पाणलोट क्षेत्रात यंदा कमी पाऊस झाल्याने हिवाळ्यातच गुजरातसमोर पाण्याचे गंभीर संकट उभे राहिले आहे. नर्मदा धरणातील पाणीसाठा कमी होत चालला असून, सौराष्ट्र आणि उत्तर गोव्यातील धरणांमध्येही अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. नर्मदा धरणात केवळ 14.66 दशलक्ष फूट पाणीसाठा शिल्लक असल्याने औद्योगिक क्षेत्राच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आला आहे. पाण्याच्या या परिस्थितीमुळे 15 मार्चनंतर सिंचनाबरोबरच औद्योगिक क्षेत्राचा पाणीपुरवठा थांबविण्यात येईल, असे गुजरातचे मुख्य सचिव जे. एन. सिंग यांनी स्पष्ट केले आहे.

पाणीसमस्येबाबत बोलताना सिंग म्हणाले, ""नर्मदा धरणातून चार राज्यांना पाणी दिले जाते. नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाने 2017-18 या वर्षासाठी केलेल्या पाणीवाटपात गुजरातचा पाण्याचा वाटा केवळ 4.71 दशलक्ष फूट आहे. मध्य प्रदेशचा 9.55, महाराष्ट्राचा 0.13 तर राजस्थानचा 0.26 दशलक्ष फूट पाण्याचा वाटा आहे. गेल्या 15 वर्षांत मागील वर्षी नर्मादेच्या पाणलोट क्षेत्रांत सर्वांत कमी पाऊस झाला. त्यातही मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या पाणलोट क्षेत्रात खूपच कमी पाऊस झाला. पाच हजार 860 दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या धरणात 21 जानेवारीला केवळ 455 दशलक्ष घनफूट पाणी शिलल्क होते. गेल्या वर्षी याच तारखेला गुजरातसाठी एक हजार 173 दशलक्ष घनफूट पाणी शिलल्क होते.''

""सद्यःस्थितीत राज्यासमोर पाण्याचे संकट असले तरी पिण्याच्या पाणीपुरवठ्यात कोणतीही अडचण नाही. नर्मदा कॅनॉलवर अवलंबून असलेल्या अहमदाबाद, वडोदरामधील तसेच अन्य महापालिकांना पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत,'' असेही त्यांनी सांगितले.

Web Title: snn gujrat narmada dam