हिमबिबट्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर

वृत्तसंस्था
सोमवार, 24 ऑक्टोबर 2016

हिमबिबट्याच्या कातडीच्या मागणीत घट झाली असली तरी या प्राण्यांना मारण्याचे प्रमाण कायम आहे. मानव व वन्यप्राण्यांमधील संघर्ष कमी होण्यासाठी व हिमाच्छादित प्रदेशात राहणारे लोक व हिमबिबट्यांच्या सहजीवनासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.
- ऋषी शर्मा, अहवालाचे सहलेखक
 

नवी दिल्ली - आशियाई हिमाच्छादित प्रदेशात आढळणाऱ्या हिमबिबट्यांची संख्या 100 पर्यंत कमी झाली आहे. बेकायदा शिकारीमुळे दरवर्षी त्यांची संख्या खालावत असून मांजार कुळातील हा प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

"ट्रेड रेकॉर्डस ऍनालिसिस ऑफ फ्लोरा अँड फौना इन कॉमर्स'(TRAFFIC) या संस्थेने या संदर्भात एक अहवाल तयार केला आहे. हिमबिट्याची 90 टक्के शिकार ही भारत, पाकिस्तान, चीन, मोंगोलिया, ताजिकीस्तान या पर्वतीय देशांमध्ये होते, असे निरीक्षण या अहवालात नोंदविले आहे. नेपाळमध्ये हिमबिबट्यांचे अस्तित्व कमी असले तरी शिकारीचे प्रमाण तेथे जास्त आहे. अन्य देशांमध्ये या प्राण्यांची शिकार करुन ते रशिया व चीनच्या बाजारात पाठविले जातात. हिमबिबट्याच्या अंगावरील फरची बेकायदा विक्री करणारी बाजारपेठ अशी अफगणिस्तानची ओळख आहे.

पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटनेत प्रतिहल्ला करुन हिमबिबट्यांना मारण्याचे प्रमाण 55 टक्के आहे. सापळा लावून हिमबिबट्यांची शिकार करण्याचे प्रमाण 18 टक्के आहे. त्यांच्या अवयवांना जगात मागणी असल्याने त्यांची बेकायदा शिकार केली आहे. हे प्रमाण 21 टक्के असल्याचे अहवालात म्हटले आहे. प्रतिहल्ला आणि सापळा रचून हिमबिबट्यांना मारल्यानंतर त्यांची बेकायदा करण्याची विक्री केली जाते. दरवर्षी 108 ते 219 हिमबिबट्यांचा अशा प्रकारे अवैध विक्री होते, अशीही नोंद अहवालात आहे. मात्र त्यांच्या व्यापारात विशेष करुन चीनमधील बाजारात हिमबिबट्यांची संख्या कमी झाली आहे, असे निरीक्षणही अहवालात आहे. यामागे मागणी घटली हे कारण नसून कायद्याची कडक अंमलबजावणीमुळे या चोरट्या व्यापारावर निर्बंध आले आहेत, असेही दिसून आले आहे.

हिमबिबट्याच्या शिकारप्रकरणी दाखल झालेल्या गुन्हांपैकी एक तृतीयांश गुन्ह्यांचा तपास करण्यात आला आहे. त्यापैकी केवळ 14 टक्के प्रकरणांची सुनावणी झाली आहे. हिमबिबट्यांशी शिकार व बेकायदा विक्री थांबविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल. हिमबिबट्याची चोरटी वाहतूक करणारे व्यापारी कायद्याला बगल देण्यासाठी ऑनलाइनचा वापर करीत असल्याने हिमबिबट्यांच्या बचावाची मोहीम इंटरनेट व सोशल मीडियावरुन प्रभावीपणे राबविणे आवश्‍यक आहे, असे मत "ट्रफिक'च्या अहवालाचे लेखक क्रिस्तिन नोवेल यांनी व्यक्त केले.

Web Title: snow leopards face extinction