सुटीसाठी परतणारे जवान रस्त्यातूनच सेवेत

सुटीसाठी परतणारे जवान रस्त्यातूनच सेवेत

बेळगाव - भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकमुळे सीमेवरील स्थिती नाजूक असून जवानांच्या रजा रद्द केल्या जात आहेत. चारच दिवसांपूर्वी लग्नाच्या बोहल्यावर चढलेल्या मलिकवाड येथील जवान राजेंद्र सुतार यांना सैन्याने रजा रद्द करून सेवेत हजर होण्याचा संदेश दिला होता.

ही घटना ताजी असतानाच आता सुटीवर येणाऱ्या एकाच कुटुंबातील दोघा भावंडांना अर्ध्या रस्त्यातूनच माघारी सेवेवर रुजू होण्याचे आदेश आले. दोन्ही जवान अथणी तालुक्‍यातील किरणगी येथील आहेत. 

पाकिस्तानवरील हल्ल्यामुळे सीमेवर युद्धजन्य परिस्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर रजा घेऊन घरी आलेल्या जवानांना त्वरित सेवेत हजर होण्याचे आदेश आले आहेत. सुटी घेऊन घराकडे परतणाऱ्या एकाच कुटुंबातील दोघा लष्करी भावंडांनाही घरी पोचण्याआधीच सीमेवर तैनातीसाठी माघारी परतावे लागल्याचा प्रसंग घडला.

किरणगीमधील माजी सैनिक सदाशिव लोहार यांना तीन मुले असून पैकी दोघेजण भारतीय सैन्यात सेवा बजावत आहेत. माजी सैनिक सदाशिव यांनी लष्करात ३४ वर्षे सेवा बजावली असून १९६५, ७१ व ९९ च्या कारगील युद्धात सहभाग घेतला होता. त्यांचा मुलगा संतोष हा सध्या जम्मू-काश्‍मीर सीमेवर तैनात असून दुसरा मुलगा अशोकचीही राजस्थान येथून नुकतीच काश्‍मीरमध्ये नियुक्ती केली आहे. दोघाही भावंडांनी एकाच वेळी रजा घेतली होती. 

दोघेही रेल्वेने गावाकडे येत असताना त्यांची रजा रद्द केल्याचे संदेश त्यांना मोबाईलवर आले. वडिलांनीही त्यांना फोन करून रजा रद्द झाल्याची माहिती दिली. त्यामुळे या दोन्ही भावंडांना घरी पोचून कुटुंबाची भेट घेण्याआधीच अर्ध्या रस्त्यातूनच देशसेवेसाठी माघारी फिरण्याची वेळ आली. 

बहुतांशी आरक्षित तिकिटे सैनिकांचीच...
जवानांची जुळवाजुळव पाहता सीमेवर भारतीय जवान सर्व परिस्थितीसाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे. रेल्वेमध्ये आरक्षित असणाऱ्या जागाही बहुतेक रजेवर आलेल्या व माघारी परतणाऱ्या लष्करी जवानांच्या नावावर आहेत. रेल्वे स्थानकावर इतर प्रवाशांपेक्षा लष्करी जवानांची संख्या अधिक दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com