गाडीतील पेट्रोल काढून मुलाने आईला पेटविले 

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जुलै 2019

- गाडीतील पेट्रोल काढून पेटविले जन्मदात्या आईला.

गाजियाबाद : एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईला जिवंत जाळले. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील खोडा परिसरात घडली. या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या उपचार सुरु आहेत.

पीडित महिला गाजियाबाद येथील संगम पार्कमध्ये वास्तव्यास आहे. तिचा मुलगा मोहनने तिला गाडीतील पेट्रोल काढून तिच्या अंगावर ओतून पेटवून देण्याचा प्रकार केला. घरात झालेला वाद विकोपाला गेल्याने संतापाच्या भरात मोहनने हे कृत्य केले.

मोहन आणि त्याची पत्नी दोघेही नोकरी करतात. त्यांना 13 वर्षांची मुलगी आहे. आई त्यांच्या मुलीची नीट काळजी घेत नसल्यामुळे त्यांच्या घरात नेहमी वाद होत असे. या वादातूनच हा प्रकार झाला.

दारूच्या नशेत घडला हा प्रकार

नातीला आई नीट सांभाळत नसल्यामुळे त्यांच्या घरात रोज वाद होत होता. या वादातून मोहनला दारूचे व्यसन लागले. त्यानंतर त्याने दारूच्या नशेत आईला मारहाण करण्याचा प्रयत्नही केला. वाद विकोपाला गेल्यानंतर मोहनने आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Son Fires Mother with Petrol in Ghaziabad