आईचा अपमान कराल तर महागात पडेल !

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 मे 2018

मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती एस. जे. काथावाल यांनी याबाबतचा निकाल दिला. मलबार हिल येथील एका महिलेने आपल्या मुलाकडून होणाऱ्या सततच्या त्रासामुळे तिच्या घराचे कुलूप बदलून घर लॉक केले होते.

मुंबई : अनेकदा आपण आई-वडिलांचा काही क्षुल्लक कारणावरून भांडण करत असतो. त्यांच्याशी वाद घालत असतो. मात्र, हा वाद आणि भांडण आता महागात पडण्याची शक्यता आहे. आपल्या जन्मदात्या आईचा अपमान आणि तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या मुलाला आईच्या घरात राहण्याचा अधिकार नसल्याचा महत्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती एस. जे. काथावाल यांनी याबाबतचा निकाल दिला. मलबार हिल येथील एका महिलेने आपल्या मुलाकडून होणाऱ्या सततच्या त्रासामुळे तिच्या घराचे कुलूप बदलून घर लॉक केले होते. त्यानंतर त्या मुलाने आपल्या पत्नीसह न्यायालयात धाव घेऊन उच्च न्यायालायत याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती काथावाल यांनी सांगितले, की संबंधित मुलाला आपल्या आईच्या घरात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. जर मुलाने आईला अपमानित केले, तिला त्रास दिला तर संबंधित मुलाला आईच्या घरात राहण्याचा अधिकार नाही. 

दरम्यान, न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतर संबंधित वृद्ध मातेला सुरक्षेचे आश्वासन दिले आणि मुलाला सांगितले, की आपल्या मालकीचे सामान त्या फ्लॅटमधून न्यायालयाच्या अधिकाऱ्यांच्या परवानगीने नेऊ शकतात. तसेच न्यायालयाने मलबार हिल पोलिस स्थानकाला आदेश दिले, की संबंधित वृद्धेला जेव्हा पोलिसांच्या सहकार्याची गरज असेल तेव्हा सहकार्य करावे. 

Web Title: The Son Who Disrespects The Mother Has No Right To Stay In The Mother House