सोनाली बेंद्रेला कर्करोग; न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू 

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जुलै 2018

आजचा दिवस चंदेरी दुनियेवर आघात करणारा ठरला, बॉलिवूडचा लढवय्या स्टार म्हणून ओळखल्या जाणारा इरफान खान कर्करोगाशी झुंज देत असतानाच अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने आज ट्‌विटरवर तिला कर्करोग झाल्याचे जाहीर करताच चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. सोनालीचा कर्करोग हा शेवटच्या टप्प्यात असून, सध्या तिच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू आहेत.

मुंबई : आजचा दिवस चंदेरी दुनियेवर आघात करणारा ठरला, बॉलिवूडचा लढवय्या स्टार म्हणून ओळखल्या जाणारा इरफान खान कर्करोगाशी झुंज देत असतानाच अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने आज ट्‌विटरवर तिला कर्करोग झाल्याचे जाहीर करताच चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. सोनालीचा कर्करोग हा शेवटच्या टप्प्यात असून, सध्या तिच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू आहेत. 

सोनालीने ट्‌विटरच्या माध्यमातून तिच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली, आयुष्यातील या खडतर वळणाची तुलना तिने फिरकीच्या चेंडूशी केली आहे."" जेव्हा तुम्ही फार कमी अपेक्षा करता तेव्हा जीवन तुमच्या दिशेने फिरकी चेंडू टाकते. नुकताच मला कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले असून, सुरवातीस तो आम्हाला स्पष्टपणे दिसत नव्हता. एका विचित्र दुखण्यानंतर काही चाचण्या करण्यात आल्या तेव्हा त्यातून कर्करोगाचे निदान झाले. माझे कुटुंबीय, जवळचे मित्र माझ्याजवळ असून ते मला लढण्याचे बळ देत आहेत. याबद्दल मी त्यांची खरोखरच ऋणी आहे,'' असे सोनालीने म्हटले आहे. रूपेरी पडद्यावरून दूर झालेल्या सोनालीने काही दिवसांपूर्वी "ड्रामेबाज' या रिऍलिटी शोमध्ये जज म्हणून काम करायला सुरवात केली होती. मध्यंतरी तिने हा शोही सोडला होता, तिची जागा नवोदित अभिनेत्री हुमा कुरेशीने घेतली होती. आजारपणामुळेच तिला हा शो सोडावा लागल्याची चर्चा आहे. 

बॉलिवूड पाठीशी 
सोनाली बेंद्रेच्या ट्‌विटनंतर बॉलिवूडप्रमाणेच सर्वसामान्य चाहत्यांनीही तिच्या या संघर्षाला पाठिंबा देत ती लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना केली आहे. अभिनेता रितेश देशमुखप्रमाणेच अन्य स्टारमंडळींनीही तिच्या या लढाईला पाठिंबा देत ती या आजारातून लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना केली आहे. 

Web Title: Sonali Bendre undergoing cancer treatment in NY