सोनभद्र हत्याकांड : योगी आदित्यनाथांनी जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षकांनाही हटवले

वृत्तसंस्था
रविवार, 4 ऑगस्ट 2019

'अनेक पोलिस अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश लवकरच दिले जातील आणि जमीन हडप केल्याप्रकरणी आदर्श कृषी समितीवर कारवाई होईल,' असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (रविवार) पत्रकारांना सांगितले.

लखनौ : जमिनीच्या वादातून दहा आदिवासी नागरिकांच्या झालेल्या हत्येमुळे देशभर चर्चेत आलेल्या उत्तर प्रदेशमधील सोनभद्र येथील जिल्हा न्यायदंडाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना राज्य सरकारने आज हटविले. तसेच, या प्रकरणाच्या चौकशीनंतर कर्तव्यात कसूर केल्याचे आढळलेल्या इतर 13 अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

'अनेक पोलिस अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश लवकरच दिले जातील आणि जमीन हडप केल्याप्रकरणी आदर्श कृषी समितीवर कारवाई होईल,' असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (रविवार) पत्रकारांना सांगितले.

याप्रकरणी 1952 पासून आतापर्यंत जे दोषी अधिकारी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच काँग्रेसच्या काळात समिती बनवून ग्रामसभेच्या जमिनीवर कब्जा करण्यात आला. यामध्ये अनेक बडे अधिकारी आणि नेते सहभागी होते. मिर्झापूर आणि सोनभद्रमध्ये खोटी सोसायटी बनवून 1 लाख हेक्टर जमिनीवर कब्जा करण्यात आला होता. या प्रकरणी एक समिती बनवण्यात आली असून, त्या समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. सोनभद्र जिल्ह्यातील उंभा येथे जमिनीच्या वादातून दहा आदिवासी शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आतापर्यंत मुख्य आरोपी असलेल्या ग्रामप्रधानासह 24 आरोपींना अटक करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonbhadra case DM and SP removed by CM Yogi Adityanath