काँग्रेसचे आज देशभर ‘चलो ईडी’

नॅशनल हेराल्ड प्रकरण : राहुल यांच्या समन्सबद्दल आक्रमक भूमिका
Sonia Gandhi And Rahul Gandhi
Sonia Gandhi And Rahul Gandhi sakal

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी उद्या (ता. १३) ईडीसमोर हजर राहणार आहेत. या निमित्ताने काँग्रेसने शक्तीप्रदर्शनाची तयारी केली असून ईडीच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला जाणार आहे. त्याचप्रमाणे तपास यंत्रणांच्या कथित गैरवापराविरुद्ध देशभरातील ईडीच्या २५ कार्यालयांसमोर काँग्रेस कार्यकर्ते निदर्शने करणार आहेत.

काँग्रेस पक्ष केंद्र सरकारवर आणि सत्ताधारी भाजपवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराचा सातत्याने आरोप करत आहे. अलीकडेच ईडीने (सक्तवसुली संचालनालय) नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल यांना नोटिसा बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. राहुल यांना दोन जून रोजी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र ते परदेशात असल्याने वेळ बदलून मागण्यात आली होती. तर, सोनिया आठ जूनला ईडीसमोर हजर राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु, सोनिया यांना कोरोना संसर्ग झाल्यामुळे त्यांची हजेरी तुर्तास टळली आहे.आता २३ जून रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे.

दरम्यान, काँग्रेसने ईडीच्या बोलावण्याला राजकीय शक्तीप्रदर्शनातून प्रत्युत्तर देण्याची रणनीती आखली आहे. याअंतर्गत आज वेगवेगळ्या राज्यांमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना तसेच प्रवक्त्यांना पाठवून पत्रकार परिषदा घेण्याची सूचना देण्यात आली होती. त्यात नॅशनल हेराल्ड प्रकरणात पक्षाची भूमिका मांडण्यात आली.

राहुल यांच्या वर्तुळातील नेते आणि तेलंगणचे प्रभारी मणिकम टागोर यांनी सांगितले, की सोनिया आणि राहुल यांना ईडीने बजावलेली नोटीस ही सूडभावनेतून आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्र सरकारने तपास यंत्रणांचा उघडउघड गैरवापर चालविला आहे. राहुल यांच्यासह ईडीच्या कार्यालयापर्यंत कार्यकर्ते मोर्चा काढतील.

प्रकरणात पैशाचा अपहार झाल्याचा आरोप निराधार असून उलट काँग्रेसने दिलेल्या आर्थिक मदतीने या संस्थेतील कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले, असा दावा टागोर यांनी केला.

सोनिया रुग्णालयात दाखल

कोरोनाची लागण झालेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा त्रास वाढल्यामुळे त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे, असेही सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वीच सोनिया यांना संसर्ग झाला होता. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्या विलगीकरणात होत्या. प्रकृतीत सुधारणा होत असताना आज त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com