केंद्राचे कृषी कायदे झुगारुन लावा; सोनिया गांधींचे मुख्यमंत्र्यांना आदेश

Sonia-Gandhi
Sonia-Gandhi

नवी दिल्ली - काँग्रेसशासित राज्यांनी केंद्राचे वादग्रस्त कृषी सुधारणा कायदे झुगारून लावावेत, यासाठी वेगळे पर्यायी कायदे तयार केले जावेत, राज्यघटनेतील कलम  २५४ (२) चा आधार घेत तशी शक्यता पडताळून पाहण्यात यावी, या आधारे राज्ये केंद्राच्या कायद्याविरोधात पर्यायी कायदे तयार करू शकतात, असे आदेश काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले आहेत. काँग्रेस हायकमांडच्या ताज्या आदेशांमुळे आता केंद्र विरुद्ध काँग्रेसशासित राज्ये असा संघर्ष भडकण्याची शक्यता आहे.

सोनिया गांधींच्या आदेशानंतर पंजाब, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांसह पुद्दुचेरीमध्ये कृषी कायद्यांची अंमलबजावणी संकटात सापडणार आहे. महाराष्ट्रातही या कायद्यांना विरोध होतो आहे. संसदेने मंजूर केलेल्या कृषी सुधारणा विधेयकांचे आता राष्ट्रपतींच्या औपचारिक संमतीनंतर कायद्यात रूपांतर झाले आहे. मात्र, या कायद्यांच्या विरोधात शेतकरी आणि विरोधी पक्ष आक्रमकपणे रस्त्यावर उतरले आहेत. शिवाय, सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्येही (एनडीए) याच मुद्यांवरून फाटाफूट झाली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या परदेशात असलेल्या सोनिया गांधींनी काँग्रेसशासित राज्यांना केंद्राचे कायदे झुगारण्याचे केलेली सूचना महत्त्वाची आहे. या मुद्द्यावर माजी केंद्रीय मंत्री व जयराम रमेश यांनी आज सकाळीच ट्विट करून, २५४ (२) कलमाचा वापर करून राज्यांनी २०१३ मध्ये भूसंपादन कायद्यातील तरतुदी झुगारल्याचा दाखला दिला होता. तसेच या कलमाचा वापर ताज्या कृषी सुधारणा कायद्यांबाबतही राज्यांना करता येईल, असे सुचविले होते. 

वेणुगोपाल यांचे निर्देश
काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेसशासित राज्यांना पक्षाध्यक्षांच्या आदेशवजा सल्ल्याबाबत माहिती देताना केंद्राचे कृषीविरोधी कायदे झुगारण्यासाठी राज्य घटनेच्या २५४ (२) या कलमाचा वापर करण्यास सांगितले आहे. याद्वारे राज्यांना केंद्राच्या कृषीविरोधी कायद्यातील तरतुदी अमान्य करता येतील, असेही वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कॉंग्रेसच्या आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेची हानी केली जात आहे हे निषेधार्ह आहे. या ऐतिहासिक कृषी कायद्यांबाबत कॉंग्रेस  धादांत खोटे बोलून शेतकरी व जनतेची दिशाभूल करत आहे. कॉंग्रेसला याची मोठी किंमत मोजावी लागेल.
- किरण रिजिजू, केंद्रीयमंत्री

हा शेतकऱ्यांना मृत्युदंड - राहुल
कृषी सुधारणा विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर नाराज झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हे कायदे म्हणजे शेतकऱ्यांसाठी मृत्युदंडाची शिक्षा असल्याची टीका केली. काँग्रेसने याच मुद्द्यावर सरकारला घेरण्यासाठी देशभरात आंदोलन सुरू केले असून युवक काँग्रेसच्या पंजाबमधील कार्यकर्त्यांनी आज  दिल्लीतील  इंडिया गेट परिसरात जुने ट्रॅक्टर पेटवून दिल्याने सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडाली. राहुल गांधींनी ट्विट करून नव्या कृषी कायद्यांवर कडाडून टीका केली. भारतातील लोकशाही मृत झाल्याचा हा पुरावा आहे, अशा कडवट शब्दांत राहुल गांधींनी या कायद्यांना लक्ष्य केले.

कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या नावाखाली आज ट्रकमध्ये  ट्रॅक्‍टर आणले व इंडिया गेटजवळ ते जाळले.  कॉंग्रेसची नौटंकी आहे.  या असल्या उपद्‌व्यापांमुळेच या पक्षाला देशाच्या जनतेने एकदा नव्हे सलग दोनदा केंद्रातील सत्तेतून बेदखल केले.
- प्रकाश जावडेकर, केंद्रीयमंत्री

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com