तिहेरी तलाकबद्दल आमची भूमिका स्पष्ट : सोनिया गांधी 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : 'तिहेरी तलाकसंदर्भात मी काहीही वक्तव्य करणार नाही. या विषयावर पक्षाची भूमिका स्पष्ट आहे', असे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी आज (शुक्रवार) सांगितले. तिहेरी तलाकच्या विधेयकात केंद्र सरकारने काल (गुरुवार) सुधारणा केल्या होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर गांधी यांनी कोणतेही वक्तव्य करण्यास नकार दिला. 

'आमच्या पक्षाची या विषयावरील भूमिका स्पष्ट आहे. यापेक्षा अधिक मी काहीही बोलणार नाही', असे सोनिया यांनी सांगितले. तिहेरी तलाकच्या विधेयकावरील काँग्रेसची भूमिका काय, हे सोनिया यांनी स्पष्ट केले नाही. मात्र, केंद्र सरकारने मांडलेल्या विधेयकामध्ये जामिनाविषयीची तरतूद करण्यासाठी काँग्रेसचा आग्रह होता. मोदी सरकारने काल केलेल्या सुधारणांमध्ये याही तरतुदीचा समावेश होता. 

या सुधारणांनुसार, तिहेरी तलाक देणाऱ्या पतीविरुद्ध पीडित महिला किंवा तिचा जवळचा नातेवाईकच पोलिसांमध्ये तक्रार दाखल करू शकतो. तसेच, पीडित महिला किंवा तिचे रक्ताचे नातेवाईक किंवा विवाहानंतर झालेल्या नातेवाईकांपैकी कुणी तक्रार दिल्यासच पोलिस गुन्हा दाखल करतील. तसेच आणखी एका तरतुदीनुसार, पती-पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी न्यायदंडाधिकारी त्यांचे अधिकार वापरू शकतात. 

तिहेरी तलाकविरोधी विधेयक लोकसभेत सहज मंजूर झाले. पण राज्यसभेमध्ये विरोधकांनी हे विधेयक रोखून धरले आहे. या विधेयकाच्या तरतुदींमध्ये जामीन मिळण्याची सुविधा द्यावी, असा विरोधकांचा आग्रह आहे. यासंदर्भात आवश्‍यक त्या सुधारणा केल्याने राज्यसभेत हे विधेयक मंजूर होईल, अशी केंद्र सरकारला आशा आहे. राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यास त्यातील सुधारित तरतुदींच्या मंजुरीसाठी हे विधेयक पुन्हा लोकसभेत मांडण्यात येईल.

Web Title: Sonia Gandhi says her party's position on Tripple Talaq