#APJAbdulKalam असे होते 'मिसाईल मॅन' अब्दुल कलाम!

टीम ईसकाळ
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

कलाम यांचा जन्मदिवस हा 'जागतिक विद्यार्थी दिवस' व 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो. त्यांचे 'अग्निपंख' हे आत्मचरित्र युवकांना प्रेरणा देणारे आहे.

भारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज 88वा जन्मदिन! भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करताना 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे त्यांचे जगभर कौतुक झाले. भारताच्या सुरक्षेतील सर्वात महत्त्वाच्या पोखरण अणुचाचणीचे ते जनक होते. अणुचाचणी यशस्वी झाल्याने अण्वस्त्रांसाठी भारताचे जगभर नाव झाले.

Image result for apj abdul kalam

कलामांना बहिणीने दागिने गहाण ठेऊन शिक्षणासाठी दिले होत पैसे
अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तमिळनाडूतील रामेश्वरम येथे झाला. कलाम यांच्या घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने त्यांचे बालपण कष्टात गेले. बालपणी वर्तमानपत्र विकण्याचे काम त्यांनी केले. शाळेत त्यांना गणिताची विशेष आवड होती. शालेय शिक्षणानंतर तिरूचिरापल्ली येथे सेंट जोसेफ महाविद्यालयात त्यांनी बी. एस. सी केले. त्यानंतर 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्‍सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्‍नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

apj abdul kalam childhood

मिसाईल मॅन
डीआरडीओमध्ये आल्यानंतर सांघिक कामावर त्यांचा जास्त विश्वास होता. स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची पहिल्यापासून जिद्द होती. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करताना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओचे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टॅंक) रणगाडा व लाइट कॉंबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

Image result for apj abdul kalam missile man

मुलांमध्ये रमणारे कलाम
महान शास्त्रज्ञ व राष्ट्रपती असतानाही कलाम हे लहान-सहान गोष्टीत आनंद शोधत असत. लहान मुलांशी गप्पा मारणे, रूद्रवीणा वाजवणे, भरपूर वाचन हे त्यांचे छंद होते. 2020 रोजी होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न कलाम यांनी पाहिले होते. भारत सरकारने त्यांना सर्वोच्च 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित केले. तसेच 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' या पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले. आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले.

Image result for apj abdul kalam drdo

कलाम यांचा जन्मदिवस हा 'जागतिक विद्यार्थी दिवस' व 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो. त्यांचे 'अग्निपंख' हे आत्मचरित्र युवकांना प्रेरणा देणारे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special article on APJ Abdul Kalam on his 88th birth anniversary