Tejaswi_Yadav
Tejaswi_Yadav

Bihar Election 2020 : बिहारला आता बदल हवाय : तेजस्वी यादव

Bihar election 2020 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाचे देशभर पडसाद उमटत आहेत, नितीशकुमार आणि भाजप यांनी सगळी ताकद पणाला लावली असली तरीसुद्धा चर्चा मात्र तेजस्वी यादव आणि चिराग पासवान या दोन तरुण तुर्कांच्या सभांची होताना दिसते. बिहारमध्ये मंगळवारी (ता.३) दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे, त्यापार्श्वभूमीवर ‘सकाळ’चे प्रतिनिधी उज्ज्वलकुमार यांनी दोन्ही नेत्यांशी साधलेला संवाद.

प्रश्‍न : निवडणुकीचे वारे कोणत्या दिशेने आहे?
तेजस्वी - लोकांना बदल हवा आहे. नितीशजी आता थकले आहेत. राज्याचा विकास करण्याची कोणतीही दृष्टी त्यांच्याकडे नाही. सर्वच लोकांना बदल हवा आहे, हे प्रचारादरम्यान फिरताना आम्हाला दिसले. अनेक सभांमध्ये मला जे जाणवले तेच सांगतोय.  

तुम्ही दहा लाख नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन दिले आहे. हे शक्य आहे का? पैसेही नाहीत आणि इतकी पदे रिक्तही नाहीत. 
पैसा आणि पदे नाहीत, असे कोणी सांगितले? सरकारकडे दृष्टी असायला हवी. राज्यात सरकारी नोकरीतील साडे चार लाख पदे रिक्त आहेत. निती आयोगाने लोकसंख्येच्या प्रमाणात पदे निर्माण करण्यास सांगितले आहे. त्यानुसार राज्यात साडे पाच लाख पदे असतील. दोन्ही मिळून दहा लाख झाले. नव्या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतील पहिला निर्णय दहा लाख रोजगार निर्माण करण्याबाबतच होणार, हे माझे आश्‍वासन आहे. 

पण यासाठी पैसा कोठून आणणार, असे राज्याचे अर्थमंत्री विचारत आहेत?
हाच तर प्रश्‍न आहे. आम्ही दहा लाख नोकऱ्यांचे आश्‍वासन दिले तर त्यासाठी लागणारे ५८ हजार कोटी कोठून आणणार असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. मात्र, भाजपने १९ लाख नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन दिले आहे. आता त्यांना सांगावे की यासाठी लागणारा पैसा कोठून आणणार? राज्याचा अर्थसंकल्प दोन लाख २४ हजार कोटींचा आहे. नितीशजींचे सरकार यातील ४० टक्के, म्हणजे ८० हजार कोटींचा निधी खर्चच करू शकत नाही. पदे भरली नाहीत, तर कामे कशी होणार? शिक्षक, नर्स, डॉक्टर, शिपाई यांची आवश्‍यकता तर भासणारच. 

बिहारच्या विकासासाठी नितीशकुमारच आवश्‍यक असल्याचे पंतप्रधानांचे म्हणणे आहे. तुमचे काय मत आहे?
हे तेच मोदी आहेत, ज्यांना नितीशजींच्या ‘डीएनए’मध्ये गडबड वाटत होती. आणि हे तेच नितीशजी आहेत, जे धुळीला मिळालो तरी भाजपबरोबर जाणार नाही, असे म्हणाले होते. यांच्यावर कोण विश्‍वास ठेवणार? त्यांची मैत्री केवळ सत्तेसाठी आहे. राज्यातील जनता या दोघांना धडा शिकवायला सज्ज झाली आहे. 

समजा कोणालाही स्पष्ट कौल मिळाला नाही तर नितीशकुमारांबरोबर जाल का?
याची वेळच येणार नाही. त्यांना सत्तेतून घालवायला लोक तयार आहेत. या सरकारजवळ जनतेला देण्यासाठी काहीही शिल्लक नाही. येऊन-जाऊन लालूजींच्या १५ वर्षाच्या सत्तेच्या गोष्टी हे लोक करतात. पण आता लोक तुमच्या १५ वर्षांच्या सत्तेचा हिशोब मागत आहेत आणि तुमच्याजवळ सांगण्यासारखे काहीही नाही. असे कसे चालेल? आणि सध्या हे तर भाजपबरोबर आहेत, त्यांच्याशी चर्चा होऊ शकत नाही. 

तुमच्या जवळ अनुभव नाही, असे नितीशजींचे म्हणणे आहे.
तर मग माझ्याविरोधात प्रचारासाठी २०-२० हेलिकॉप्टर का बिहारमध्ये येत आहेत? आमच्याविरोधात केंद्रीय मंत्र्यांची फौज प्रचारात उतरवली आहे. माझ्या जवळ अनुभव नाही तर इतकी कुमक कशासाठी?

राजदचे ‘एम-वाय’ (मुस्लिम-यादव) समीकरण आता प्रभावहीन झाले असल्याचे बोलले जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतही तुम्हाला एकही जागा मिळाली नाही. 
आम्ही केवळ ‘एम-वाय’ पक्ष नाही. हा आमच्याविरोधातील अपप्रचार आहे. आम्ही सर्वच जातीवर्गांना प्रतिनिधित्व दिले आहे. लोकसभेतही आम्हाला २० टक्के मते मिळाली होती. ही केवळ समीकरणाची किमया नाही. 

असे म्हणतात की, बिहारी जनतेने लालूंना संधी दिली आणि लालूंनी राज्याला जंगलराज बनवले.
असे बोलून गरिबांच्या राज्याला बदनाम केले जात आहे. आपले अपयश झाकण्यासाठी नितीशजी जनतेच्या मनात भीती निर्माण करू पाहात आहेत. हे सरकार आता जनतेवरील ओझे बनले आहे. लोकांना हे ओझे फेकून द्यायचे आहे. मला सांगा, १५ वर्षांत किती लोकांना रोजगार मिळाला? लोकांचे स्थलांतर रोखण्यासाठी तुम्ही काय केले?

चिराग पासवान आणि तुम्ही एकमेकांवर अजिबात टीका करत नाहीत. तुमच्यात काही समझोता झाला आहे का?
अजिबात नाही. ते एनडीए मध्ये आहेत आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढत आहेत. नितीश यांचे सरकार प्रत्येक आघाडीवर अयशस्वी ठरल्याचे चिराग स्वत: सांगत आहेत. त्यांना भाजपबरोबर सत्ता स्थापन करायची आहे. मग आमच्यात समझोता कसा होणार?

लालूप्रसादांचे छायाचित्र एकाही पोस्टरवर नाही, त्यांना अडगळीत टाकल्याचा जे. पी. नड्डांचा आरोप आहे.
लालूजी पक्षाचे अध्यक्ष आहेत, माझी आई राबडीदेवी यांना मधुमेह आहे. अनेक लोक पडद्यामागून काम करत आहेत. आम्ही पुढे आहोत, म्हणून आमचे छायाचित्र दिसते. मात्र, सर्वच लोक बिहारच्या विकासासाठी झटत आहेत.

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com