गाडीला उशीर झाला तरच वेग वाढवा 

पीटीआय
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

रेल्वे गाडीला विलंब झाला तरच फक्त वेळ भरून काढण्याइतपत रेल्वेचा कमाल निधारित वेग वाढवण्याची परवानगी रेल्वेचालकाला देण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयाच्या सूत्राने सांगितले आहे. पूर्वीप्रमाणे रेल्वेचालकाला संपूर्ण प्रवास वाढलेल्या वेगाने गाडी नेण्यास परवानगी आता नाही. 
 

नवी दिल्ली : रेल्वे गाडीला विलंब झाला तरच फक्त वेळ भरून काढण्याइतपत रेल्वेचा कमाल निधारित वेग वाढवण्याची परवानगी रेल्वेचालकाला देण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयाच्या सूत्राने सांगितले आहे. पूर्वीप्रमाणे रेल्वेचालकाला संपूर्ण प्रवास वाढलेल्या वेगाने गाडी नेण्यास परवानगी आता नाही. 

नवे नियम हे सन 2000 च्या मार्गदर्शक सूचनांची जागा घेईल. या मार्गदर्शक सूचनांनुसार, गाडी वेळेत असली तरी चालक मान्यताप्राप्त अधिकाधिक गतीने (एमपीएस) गाडी नेऊ शकत होते. मात्र, अशी कृती क्वचितच व्हायची. गाडीवरील वाढता ताण लक्षात घेता अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता. लोकोचालकांना एमपीएस गतीची भीती असल्याने आणि ओव्हरस्पीडिंगची धास्ती असल्याने गाड्यांचे वेळापत्रक विस्कळित होऊ लागले होते.

ओव्हरस्पीडने गाडी नेल्यास संबंधित रेल्वेचालकावर दंड आकारला जातो. मात्र, आता नव्या नियमांचे वेळापत्रक 15 ऑगस्टला जारी होणार असून, या वेळापत्रकानुसार रेल्वे 110 किलोमीटर प्रतितास वेग राखता येणार आहे; तसेच निश्‍चित केलेला वेग हा 105 किलोमीटर इतका असून, ज्या गाड्यांचा एमपीएस 120 किलोमीटर प्रतितास असेल ते 115 पर्यंत वेग राखू शकतील. मेल आणि एक्‍स्प्रेस गाड्यांसाठी मान्यताप्राप्त गती 110 किलोमीटर इतकी निश्‍चित केली आहे. मात्र, ते 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेग राखत असल्याचे आढळून आले आहे. राजधानी, शताब्दीसारख्या गाड्यांनी एमपीएस 130 किलोमीटर प्रतितास राखावा असे म्हटले आहे. मात्र, त्या 60 ते 90 किलोमीटर वेगाने धावताना दिसतात. परिणामी चालू वर्षात 30 टक्के गाड्या उशिराने धावत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे चालकांना निश्‍चित वेगाने गाडी नेण्यास परवानगी दिली आहे. मात्र, जेव्हा गाड्यांना उशीर होत असेल तर गाडी मान्यताप्राप्त अधिकाधिक वेगाने नेता येऊ शकेल.

आपली गाडी मान्यताप्राप्त अधिकाधिक वेगाने चालवण्याची गरज असताना चालक ओव्हरस्पीडिंगच्या दंडाच्या धास्तीने हळू नेण्याची प्रवृत्ती बळावल्याचे एका लोको पायलटने सांगितले. 

Web Title: Speed ​​up only if the railway is late