द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे सर्रास उल्लंघन

वृत्तसंस्था
रविवार, 9 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक गजबजलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे सर्रास उल्लंघन होत असून, तब्बल 65 टक्के मोटार आणि जीपचालक उल्लंघनात आघाडीवर आहेत. एवढेच नव्हे; तर सुरक्षेसाठी अत्यावशक असलेल्या सीटबेल्टचा वापरही प्रवाशांकडून होत नसल्याचे एका अध्ययनातून समोर आले आहे. 

नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक गजबजलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे सर्रास उल्लंघन होत असून, तब्बल 65 टक्के मोटार आणि जीपचालक उल्लंघनात आघाडीवर आहेत. एवढेच नव्हे; तर सुरक्षेसाठी अत्यावशक असलेल्या सीटबेल्टचा वापरही प्रवाशांकडून होत नसल्याचे एका अध्ययनातून समोर आले आहे. 

वाहतूक सुरक्षेच्या मुद्द्यावर काम करणाऱ्या दिल्लीतील "सेव्ह लाइफ' या सामाजिक संस्थेने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचे अध्ययन केले असून, संभाव्य अपघात टाळण्यासाठी या महामार्गावरील गस्तीपथकांमध्ये वाढ केली जावी, अशीही सूचना केली आहे. यासाठी या महामार्गावरील सर्व प्रकारच्या 800 हून अधिक प्रवाशांच्या तसेच वाहतूक पोलिस आणि रुग्णवाहिका सेवा देणाऱ्या घटकांचे अध्ययन करण्यात आले आहे. भारतीय महामार्गांवर दर दोन किलोमीटरला एक अपघाती मृत्यू होत असल्याची वार्षिक सरासरी असली, तरी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मात्र दर दोन किलोमीटरला दोन अपघाती मृत्यू होत असल्याची धक्कादायक आकडेवारी आहे. या द्रुतगती महामार्गावर कमाल वेगमर्यादा ताशी 80 किलोमीटर असताना 65 टक्के कार आणि जीपचालक ठरवून दिलेल्या वेगमर्यादेचे उल्लंघन करतात.

सोबतच या वाहनांमध्ये चालकांनी सीटबेल्ट लावण्याचे प्रमाणही नगण्य आहे. चालकांसह पुढे आणि मागे बसणारे 42.3 टक्के प्रवासी सीटबेल्ट वापरत नाहीत, असे पाहणीत आढळले आहे. सीटबेल्टचा वापर टाळणाऱ्यांमध्ये 18 ते 25 वयोगटातील चालक किंवा प्रवासी असल्याचे "सेव्ह लाइफ'चे म्हणणे आहे. 

थकवा आणि अतिवेग कारणीभूत 

द्रुतगती महामार्गावरील अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमध्ये वाहनचालकांना येणारा थकवा, अल्कोहोलचे सेवन आणि अतिवेग ही प्रमुख कारणे आहेत. 71 टक्के जड वाहनचालकांनी आणि 50 टक्के बस व ट्रकचालकांनी थकव्यामुळे वाहन चालविताना झोप येत असल्याची कबुली दिली आहे.

तर 46 टक्के वाहनचालक अल्कोहोलमुळे आणि 38 टक्के वाहनचालकांनी अतिवेगामुळे अपघात होण्याची भीती बोलून दाखविली आहे. महामार्गावरील तीव्र वळणांचा असलेला धोका, टायर फुटणे, ब्रेक निकामी होणे, हादेखील चिंतेचा विषय आहे. परंतु, अपघाताच्या क्षणी आपल्या नेमक्‍या स्थानाची माहिती कळविण्यात तब्बल 69 टक्के वाहनचालक अनभिज्ञ असल्याचेही आढळून आले आहे. 

Web Title: Speed violation on Highway