भारतीय पर्यटक आणि उद्योजकांना श्रीलंका सरकारची हाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Lanka

भारतीय पर्यटक आणि उद्योजकांना श्रीलंका सरकारची हाक

मुंबई : अस्थिर परिस्थितीच्या गर्तेतून सावरत असलेल्या श्रीलंकेने आपल्या अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीसाठी भारतीय पर्यटकांना आणि उद्योजकांना श्रीलंकेत येण्याची हाक दिली आहे. देशातील परिस्थिती आता निवळल्याचाही त्यांचा दावा आहे.

श्रीलंकेचे पर्यटन आणि जमीन विषयक मंत्री हरीन फर्नांडो यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय शिष्टमंडळ सध्या भारतात आले आहे. पर्यटन आणि उद्योग वाढीसाठी त्यांनी भारताकडून मदतीची अपेक्षा केली असून श्रीलंकेतील परिस्थिती आता सुधारली आहे त्यामुळे पर्यटकांनी व उद्योजकांनी नि:शंकपणे श्रीलंकेत यावे असे आवाहनही त्यांनी आज येथे केले.

भारतीय रुपया चालणार

श्रीलंकेला आपले अर्थचक्र पुन्हा सुरू करायचे असून आता देशातील परिस्थिती शांत होत आहे. त्यामुळे श्रीलंका पर्यटकांच्या स्वागताला तयार झाला आहे. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेतील पर्यटनाचा वाटा मोठा असून पर्यटनातही भारतीयांचा सिंहाचा वाटा आहे. भारतीयांसाठी भारतीय चलन श्रीलंकेत चालण्याबाबतही लवकरच तेथील सरकारकडून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.

कॅसिनो डेस्टिनेशन अशी ख्याती असलेल्या श्रीलंकेत समुद्र, धबधबे, जंगल सफारी, एडवेंचर पार्क आदी सर्व बाबी बघता येतील. व्हिसा मिळण्याची प्रक्रियाही सोपी असून एका भारतीय रुपयाला श्रीलंकेचे पाच रुपये मिळतील. इतकेच नव्हे तर पर्यटकांना इंधनासाठी पास देऊन सहज पेट्रोल मिळेल याची व्यवस्था केली जाईल. तेथील तेथील भारतीय हॉटेलमध्ये शाकाहारी खाणेही सहज मिळते. तसेच जैन फूड देखील काही हॉटेलात मिळू शकेल, असेही आज सांगण्यात आले.

कोरोना निर्बंध शिथिल

आता कोरोनाचे निर्बंधही शिथिल झाले असून लसीकरण प्रमाणपत्र तसेच कोरोना चाचणीची गरज नाही. भारतीय चित्रपटाच्या शूटिंगसाठीही प्रयत्न केले जातील असेही मंत्री फर्नांडो म्हणाले.

जयसूर्या ब्रँड अँबेसेडर

भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये सांस्कृतिक व ऐतिहासिक संबंध असून आता आम्हाला देशाची अवस्था सुधारण्यासाठी भारतीय जनता, सरकार आणि प्रसार माध्यमे यांचा पाठिंबा हवा आहे, असे माजी क्रिकेटपटू व श्रीलंका पर्यटन क्षेत्राचा ब्रँड अँबेसिडर सनथ जयसूर्या याने सांगितले.