अमरनाथ यात्रेसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 जून 2017

राज्यपाल व्होरा यांनी घेतला तयारीचा आढावा; उद्यापासून प्रारंभ

श्रीनगर: दहशतवाद्यांचा धोका असल्याने अमरनाथ यात्रेसाठी यंदा अभूतपूर्व सुरक्षा व अन्य तयारी केली आहे. यात्रेसाठी नोंदणी केलेल्या भाविकांना विम्याचे संरक्षण दिले असून, या वेळी विम्याची रक्कम एक लाखावरून तीन लाख रुपये केली आहे. यात्रेला 29 जूनपासून प्रारंभ होत आहे. अमरनाथ गुहा दक्षिण काश्‍मीरमध्ये समुद्रसपाटीपासून 14 हजार फूट उंचीवर आहे.

राज्यपाल व्होरा यांनी घेतला तयारीचा आढावा; उद्यापासून प्रारंभ

श्रीनगर: दहशतवाद्यांचा धोका असल्याने अमरनाथ यात्रेसाठी यंदा अभूतपूर्व सुरक्षा व अन्य तयारी केली आहे. यात्रेसाठी नोंदणी केलेल्या भाविकांना विम्याचे संरक्षण दिले असून, या वेळी विम्याची रक्कम एक लाखावरून तीन लाख रुपये केली आहे. यात्रेला 29 जूनपासून प्रारंभ होत आहे. अमरनाथ गुहा दक्षिण काश्‍मीरमध्ये समुद्रसपाटीपासून 14 हजार फूट उंचीवर आहे.

"हुर्रियत कॉन्फरन्स' या फुटीरतावादी संघटनेचे अध्यक्ष सईद अली शाह गिलानी यांनी अमरनाथ यात्रेला येणाऱ्या भाविकांचे स्वागत केले आहे. ""ते आमचे पाहुणे आहेत. भाविकांना काश्‍मीरमध्ये असुरक्षित वाटेल अशी एकही घटना घडलेली नाही. उलट काश्‍मिरी जनता भाविकांना सर्व मदत करीत असते,'' असे ते म्हणाले. तेरा वर्षांखालील मुले, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व सहा आठवड्यांच्या गर्भवतींना यात्रेत सहभागी होण्यास श्री अमरनाथ देवस्थान मंडळाने मज्जाव केला आहे. तसेच महिला भाविकांनी साडीऐवजी सलवार-कमीज, पॅंटशर्ट, ट्रक सूट व खेळाचे बूट वापरावेत, अशा सूचनाही केल्या आहेत. यात्रेदरम्यान मद्यपान व तळलेले पदार्थ सेवन न करण्याचीही सूचना दिली आहे.

जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा हे देवस्थान मंडळाचे अध्यक्ष असून त्यांनी सोमवारी (ता. 26) यात्रेच्या बालताल मार्गाची हवाई पाहणी केली. तसेच अमरनाथ गुहेलाही भेट दिली. ही यात्रा दोन मार्गाने करता येते. दक्षिण काश्‍मीरमधील पहलगाममधील नुनवान व मध्य काश्‍मीरमधील गंडेरबाल जिल्ह्यातील बालताल हे तळ लष्कराच्या ताब्यात देण्यात आले आहे. या मार्गावर दहशतवादी हल्ला व अन्य अनुचित घटना घडू नये म्हणून तीनस्तरीय सुरक्षा व्यवस्था केली असल्याचे सांगण्यात आले. लष्कारासह, निमलष्करी दले, राज्य पोलिसांचांही बंदोबस्त मार्गावर ठेवला आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 200 जादा तुकड्या तैनात केल्या आहेत. जम्मूतील भगवतीनगर येथील तळापासून देवस्थानपर्यंत भाविकांसाठी सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दक्षिण काश्‍मीरमध्ये दहशतवादी कारवायांना तोंड देण्यासाठी दोन जादा बटालियन तैनात करण्याचा निर्णय लष्कराने घेतला आहे. 24 मदत पथकेही यात्रेत असतील, अशी माहिती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमंग नरुला यांनी सांगितले. काश्‍मीर खोऱ्यात गेल्या काही महिन्यांत दहशतवादी कारवाया आणि दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर यंदा सुरक्षा व्यवस्थेत तिपटीने वाढ केली आहे. असे असले तरी यात्रेदरम्यान कोणत्याही दहशतवादी संघटनांकडून धोका नसल्याचा निर्वाळा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

यात्रेची तयारी...
- दोन लाख भाविकांची नोंद
- यात्रेकरूंना तीन लाखांचा विमा
- तीनस्तरीय सुरक्षा व्यवस्था
- लहान मुले, ज्येष्ठ व गर्भवतींना मनाई
- महिलांनी साडीऐवजी शर्टपॅंट घालण्याची सूचना
- 35 श्‍वान पथकांचा समावेश

Web Title: srinagar news amarnath yatra and security