गौरी लंकेश प्रकरणी श्रीराम सेनेच्या अध्यक्षाची "एसआयटी' करणार चौकशी

वृत्तसंस्था
शनिवार, 16 जून 2018

श्रीराम सेना आणि वाघमारे यांच्यात कोणताही संबंध नाही. तो आमचा सदस्यही नाही आणि कार्यकर्ताही नाही, हे मी स्पष्टपणे सांगत आहे. वाघमारे श्रीराम सेनेचा नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे, असे श्रीराम सेनेचा संस्थापक अध्यक्ष  प्रमोद मुतालिक याचे म्हणणे आहे.

बंगळूर : पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) या प्रकरणात श्रीराम सेनेचा विजयपुरा जिल्हाध्यक्ष राकेश मथ याला चौकशीसाठी समन्स पाठविले आहे. 

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने याविषयी माहिती देताना सांगितले, की गौरी लंकेश यांच्यावर गोळी झाडणारा संशयित परशुराम वाघमारे श्रीराम सेना या हिंदुत्ववादी संघटनेचा सक्रिय सदस्य असल्यामुळे एसआयटीने मथ याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

एसआयटीमध्ये समावेश असलेल्या या अधिकाऱ्याने सांगितले, की गौरी यांच्या हत्येमध्ये मथ याचाही हात आहे का किंवा कटात सहभागी होण्यासाठी त्याने वाघमारेला प्रवृत्त केले नव्हते ना, याची माहिती मिळविण्याचा पथकाचा प्रयत्न आहे. 

कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यातील सिंदागी शहरात जानेवारी 2012मध्ये तहसीलदार कार्यालयावर पाकिस्तानी झेंडा फडकविण्यात आला होता. यामध्ये मथ आणि वाघमारे यांचा कथितरीत्या सहभाग होता. कर्नाटकच्या विविध भागांत आणि मंगळूरसह किनारपट्टी भागात मथचा चांगला प्रभाव आहे, असे एसआयटीला वाटते. 

लंकेश यांची गेल्या वर्षी 5 सप्टेंबरला बंगळूरस्थित निवासस्थानी प्रवेशद्वारावर गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक याने स्वत:चा तसेच संघटनेचा वाघमारे आणि गौरी यांच्या हत्येशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. 

श्रीराम सेना आणि वाघमारे यांच्यात कोणताही संबंध नाही. तो आमचा सदस्यही नाही आणि कार्यकर्ताही नाही, हे मी स्पष्टपणे सांगत आहे. वाघमारे श्रीराम सेनेचा नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे, असे श्रीराम सेनेचा संस्थापक अध्यक्ष  प्रमोद मुतालिक याचे म्हणणे आहे.

Web Title: Sriram Sena chief enquiry from SIT