नागरिकांच्या दगडफेकीमुळे दोन जवान झाले दृष्टिहीन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

या प्रकारात नेपाळचा एक नागरिक ठार झाल्याचा दावा नेपाळने केला होता. त्यासंदर्भात "एसएसबी'च्या मुख्यालयाने गृह मंत्रालयाला अहवाल सागर केला असून, गोळीबार केला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नवी दिल्ली - काश्‍मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलावर (सीआरपीएफ) लोकांकडून झालेल्या दगडफेकीच्या घटनेप्रमाणेच भारत-नेपाळ सीमेवर गेल्या मार्च महिन्यात नऊ तारखेला नागरिकांनी केलेल्या दगडफेकीमुळे सशस्त्र सीमा दलाच्या (एसएसबी) दोन जवानांना दृष्टी गमवावी लागली आहे. या जवानांवर चेन्नई येथील शंकर नेत्रालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेत जवान एस. प्रभाकर यांचा डावा डोळा निकामी झाला आहे, तर त्याचे वरिष्ठ कंपनी कमांडर टी. के. हंस यांना उजव्या डोळ्याची 50 टक्के दृष्टी गमावावी गेली आहे. गेल्या नऊ मार्चला भारत-नेपाळ आंतरराष्ट्रीय सीमेवर लक्ष्मीपूर खेरी जिल्ह्यातील बसई तळाजवळ एक बांधकाम सुरू असल्याचे आढळल्याने "एसएसबी' चे जवान तेथे गेले असता, जवानांनी केलेल्या गोळीबारामुळे एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत लोकांनी जवानांवर दगडफेक सुरू केली. यात प्रभाकर आणि हंस यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली होती. उपचारासाठी त्यांना चेन्नईतील शंकर नेत्रालयात दाखल करण्यात आले होते.

या प्रकारात नेपाळचा एक नागरिक ठार झाल्याचा दावा नेपाळने केला होता. त्यासंदर्भात "एसएसबी'च्या मुख्यालयाने गृह मंत्रालयाला अहवाल सागर केला असून, गोळीबार केला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. "नागरिकांच्या या दगडफेकीत 13 जवान जखमी झाल्याचे मला चांगले आठवत आहे,' असे हंस यांनी सांगितले.

Web Title: SSB jawans, civilians hurt in stone pelting by Nepalese citizens near border