"द्रमुक'मध्ये स्टॅलिनपर्व

पीटीआय
गुरुवार, 5 जानेवारी 2017

कार्याध्यक्ष झालेल्या स्टॅलिन यांना अध्यक्षपदाचे सर्व अधिकार वापरता येतील. करुणानिधींची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली असून, त्यांना याआधीही दोनदा उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते

चेन्नई - तमिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या "द्रमुक'च्या कार्याध्यक्षपदी आज पक्षाचे खजिनदार एम. के. स्टॅलिन यांची निवड करण्यात आली. पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी सध्या आजारी असल्याने पक्षाची धुरा स्टॅलिन यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एका नेत्याने सांगितले. स्टॅलिन यांना कार्यकारी अध्यक्ष करण्यासाठी आज पक्षाच्या नियमांतही बदल करण्यात आले. पक्ष कार्यकारिणीच्या आज झालेल्या सर्वसाधारण बैठकीत स्टॅलिन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, या बैठकीस करुणानिधी मात्र उपस्थित राहू शकले नाहीत. पक्षाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये स्टॅलिन यांच्या निवडीचा ठराव एकमुखाने मांडण्यात आला होता, असे राष्ट्रीय सरचिटणीस के. अनभझगन यांनी सांगितले.

कार्याध्यक्ष झालेल्या स्टॅलिन यांना अध्यक्षपदाचे सर्व अधिकार वापरता येतील. करुणानिधींची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली असून, त्यांना याआधीही दोनदा उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. "द्रमुक'चे राज्यसभा सदस्य आर. एस. बाराथी यांनी आजच्या बैठकीत स्टॅलिन यांच्या निवडीसंबंधीचा ठराव मांडला होता. पक्षाचे सरचिटणीस दुराई मुरुगन यांनी त्याला अनुमोदन दिले. दरम्यान, स्टॅलिन पक्षाचे कार्याध्यक्ष झाल्याचे समजताच "द्रमुक'च्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.

भावना अनावर
निवडीनंतर पक्ष नेत्यांसमोर करुणानिधी यांच्या प्रकृतीबाबत बोलताना स्टॅलिन यांना अश्रू आवरता आले नाहीत. यापूर्वी मी जेव्हा पक्षाची पदे स्वीकारली तेव्हा त्यांना मोठा आनंद झाला होता; पण या वेळी तो आनंद मला पाहणे शक्‍य नाही. पक्षातील माझी भूमिका केवळ अध्यक्षांचा साहाय्यक अशी राहील, असे स्टॅलिन यांनी नमूद केले. यानंतर स्टॅलिन यांनी गोपालपुरम येथे जाऊन करुणानिधी यांचे आशीर्वाद घेतले.

Web Title: Stalin Promoted