"स्टरलाइट'वरून राजकारण द्रमुकचे धरणे आंदोलन; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर आरोप 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 मे 2018

वेदांता ग्रुपचा तुतीकोरिनमधील विस्तार स्टरलाइट कॉपर प्रकल्प बंद करण्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनामध्ये आता राजकीय पक्षांनी प्रवेश करत एकमेकांवर चिखलफेक सुरू केली आहे. 

चेन्नई - वेदांता ग्रुपचा तुतीकोरिनमधील विस्तार स्टरलाइट कॉपर प्रकल्प बंद करण्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनामध्ये आता राजकीय पक्षांनी प्रवेश करत एकमेकांवर चिखलफेक सुरू केली आहे. 

तमिळनाडूमधील सत्तारूढ अण्णा द्रमुक आणि विरोधी पक्ष द्रमुक यांच्यामध्ये आज चांगलीच जुगलबंदी रंगली. द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन आणि त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्या कार्यालयासमोरच धरणे आंदोलन करत जोरदार निदर्शने केली. पोलिसांनी या सर्वांना जबरदस्तीने हटवून अटक केली. प्रकल्पाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी चर्चेस नकार दिल्याचा आरोप द्रमुकने केला. 

दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी या मुद्द्यावर प्रथमच मौन सोडताना विरोधी पक्ष हिंसाचाराला चिथावणी देत असल्याचा आरोप केला. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आदेश दिल्यानंतर या प्रकल्पाचा वीजपुरवठा बंद करण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले, की काही समाजविरोधी घटक आंदोलनकर्त्यांना हिंसाचारासाठी उद्युक्त करत आहेत. हा प्रकल्प बंद करण्यासाठी सरकारने सर्व कायदेशीर पावले उचलली असून, याबाबतची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. 

तुतीकोरिनमधील पोलिस गोळीबार, तसेच सध्याच्या स्थितीवर गृह मंत्रालयाने तमिळनाडू सरकारकडून अहवाल मागविला आहे. तुतीकोरिनमधील लोकांना मी शांत राहण्याचे आणि शहरात शांतता कायम राखण्याचे आवाहन करतो. 
- राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री 

मृतांची संख्या तेरावर 
तुतुकोरिनमधील प्रदूषणाविषयी चिंता व्यक्त करत वेदांता ग्रुपचा स्टरलाइट कॉपर प्रकल्प बंद करण्याची मागणी करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला होता. आता ही संख्या तेरावर पोचली आहे. पोलिस गोळीबारात जखमी झालेल्या आणखी एकाचा आज रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. 

आज "बंद'चे आवाहन 
तमिळनाडूमधील द्रमुक तसेच अन्य विरोधी पक्षांनी तुतीकोरिनमधील पोलिसांच्या कारवाईचा निषेध करताना उद्या (शुक्रवार) दिवसभर बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. 

Web Title: starlite politics in tamilnadu