खाणी लवकर सुरू करा: प्रतापसिंह राणे

goa
goa

पणजी : गोव्यात खाणींवर दोन लाख जण अवलंबून आहेत. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. खाणकामबंदीमुळे आर्थिक व सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. यास्तव खाणकाम सुरु करावे, अशी मागणी पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी गोवा विधानसभेत केली. अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेच्यावेळी ते बोलत होते. त्यांनी याविषयीचा कायदेशीर सल्लाही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना लेखी स्वरुपात सादर केला.

ते म्हणाले, १० वर्षाचा असल्यापासून मी खनिज वाहतूक पाहत आहे. पूर्वी बैलगाडीतून ही वाहतूक चाले. आता खाणकामाची प्रगती कुठवर झाली हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्याबाबतही प्रत्येकाची वेगवेगळी मते आहेत.  खाणकामबंदीमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. त्यांना पर्यायी रोजगार देण्यात आलेला नाही. ट्रकवाले, बार्जवाले कर्जाच्या फेऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या रोजीरोटीवर परीणाम झाला आहे. गोवा फाऊंडेशन न्यायालयात गेले आणि खाणकामावर बंदी आणली त्यातून केवऴ मोठ्या लोकांनाच त्रास झाला असे नाही तर सर्वसामान्यांनाही त्रास झाला आहे. खाणींवर अवलंबित दोन लाख जण आहेत. त्यांची अपरिमित सामाजिक व आर्थिक हानी झाली आहे. खाणकाम पुन्हा सुरु केले पाहिजे. नियंत्रण आणा पण खाणी सुरु करा. पर्यावरणाची व निसर्गाची फारशी हानी न करता हा व्यवसाय सुरु करावा.

अभयारण्यांचा विकास केला पाहिजे. तेथे लोकांनी भेटी द्याव्यात यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे. गोवा हरीत आहे तो तसाच राखला पाहिजे. निसर्ग हेच गोव्याचे सौंदर्य आहे. अभयारण्यात पर्यटनाला चालना दिली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो म्हणाले, १९८२ मध्ये मी आमदार होतो. त्यावेळी काणकोणला जाताना झाडे कापताना दृष्टीस पडली. प्रतापसिंह राणे त्यावेळी मुख्यमंत्री होते. वृक्षसंवर्धनासाठी मी खासगी विधेयक आणले. मी सत्ताधारी पक्षात होतो. त्यामुळे ते मंजूर करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नव्हते. त्यानंतर सरकारने दुसरे विधेयक आणले आणि ते मंजूर केले. त्यामुळे वृक्षसंवर्धन करणे शक्य झाले. खाणकामामुळे गोव्याचा भूगोल बदलला. टेकड्या, डोंगर नष्ट झाले. एकेकाळी खाणकामाने गोव्याला, गोमंतकीय जनतेला सावरले. लोकलेखा समिती म्हणते निम्म्या खाणी बेकायदा होत्या, वनक्षेत्रात खाणकामावर परवानगी नव्हती, एक लाख झाडे खाणकामासाठी कापण्यात आली.

भारतीय खाण ब्युरोच्या  म्हणण्यानुसार एक हजार दोनशे दशलक्ष टन खनिज आहे. त्यावरून गोवा हे श्रीमंत राज्य ठरते. कमीत कमी ४ लाख ५० हजार कोटी रुपयांची ही संपत्ती आहे. १४ हजार कोटी रुपये राज्यावर कर्ज आहे. खाण अवलंबितांचे एक हजार कोटी रुपयांचे कर्ज जमेस धरले तरी ३० वर्षांचा खर्च या संपत्तीतून करता येऊ शकतो. नागरीकांना कोणताही कर सरकारी खर्चासाठी आकाराला लागणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. टुजी स्पेक्ट्र्म खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने लिलाव करा असे सांगितले आहे. खाणकाम सुरु करा असे आमचेही म्हणणे आहे पण सारेकाही कायदेशीर करा, असे त्यांनी नमूद केले.

फोंड्याचे आमदार रवी नाईक म्हणाले, ट्रक, यंत्रे, बार्ज पडून आहेत. सर्वकाही गंजू लागले आहे. खाणकामबंदीमुळे हे सारे होत आहे. ३ सप्टेंबर २०१४ मध्ये कर्जमाफी योजना सरकारने राबविली त्यांना राष्ट्रीयीकृत बॅंकांनी प्रतिसाद दिला. सहकारी बॅंकांच्या माध्यमातून ही योजना राबविली पाहिजे. मालमत्ताच गंजू लागल्याने वसुली करता येणार नाही हे लक्षात घ्यावे. लोक अडचणीत सापडले आहेत. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या माध्यमातून प्रकल्प मार्गी लागले नाहीत. रोजगार निर्मिती झाली नाही. केवळ आश्वासनेच दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com