स्टार्टअप करणाऱ्यांना सरकारचा दिलासा !

Startupers excluded from Angel Taxes
Startupers excluded from Angel Taxes

नवी दिल्ली : नवउद्यमींच्या (स्टार्टअप) पंखांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी (ता. 19) मोठे निर्णय घेतले. स्टार्टअप्स व्याख्येचा विस्तार करतानाच नवउद्यमींना जाचक ठरू पाहणाऱ्या 'एंजेल टॅक्‍स'मधून वगळण्याचा प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विटरवरून दिली.  

नवउद्यमींच्या व्याख्येत सुधारणा करण्यात आली असून, नोंदणीपासून 10 वर्षांपर्यंत कोणतीही कंपनी स्टार्टअप म्हणून ओळखली जाईल, असे प्रभू यांनी सांगितले. यापूर्वी नोंदणीपासून 7 वर्षांपर्यंत कंपनी स्टार्टअप म्हणून ओळखली जात होती. याशिवाय सरकारने स्टार्टअपची उलाढाल मर्यादादेखील 25 कोटींवरून 100 कोटींपर्यंत वाढवली आहे.

ज्या कंपन्यांची आर्थिक वर्षातील उलाढाल शंभर कोटींपर्यंत आहे अशा कंपन्यांना यापुढे स्टार्टअपचा दर्जा मिळेल, असे प्रभू यांनी ट्विट केले. याशिवाय प्राप्तिकर कलम 56 (2) (vii) नुसार नवउद्यमींना कर सवलतीची नियामवली शिथिल करण्यात आली. त्या कलमानुसार बड्या गुंतवणूकदारांची (एंजेल इन्व्हेस्टर) गुंतवणूक नवउद्यमींना इतर स्त्रोतातील उत्पन्न म्हणून दाखवता येईल. नव्या व्याख्यानुसार कर सवलत मिळवण्यासाठी नवउद्यमीचा दर्जा मिळवण्यासाठी व्यावसायिकांना केंद्राच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन मंडळाकडे (डीपीआईआईटी) ऑनलाईन अर्ज करावा लागेल. शंभर कोटींहून कमी उलाढाल असणाऱ्या कंपन्यांना नव्या नियमावलीनुसार स्टार्टअपअंतर्गत सवलती मिळू शकतात. त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना सवलतीच्या दरात कर्जे, करातील कपात आदी लाभ मिळतील. 

'एंजेल टॅक्‍स' नोटिशींमुळे नवउद्यमी हैराण -
भांडवली गरज भागवण्यासाठी नवउद्यमी बड्या गुंतवणूकदारांकडून (एंजेल इन्व्हेस्टर) शेअर्सच्या माध्यमातून निधी उभारतात. बऱ्याचदा हे शेअर मूळ किमतीपेक्षा जास्त किमतीने विकले जातात. त्यामुळे शेअर्समधून येणाऱ्या उत्पन्नावर 'एंजेल टॅक्‍स' लावला जातो. 2015-16 आणि 2016-17 या वर्षात एंजेल इन्व्हेस्टरकडून गुंतवणूक स्वीकारणाऱ्या जवळपास 73 टक्के नवउद्यमींना प्राप्तिकर विभागाने प्राप्तिकर कलम 56 (2) (vii) अंतर्गत 'एंजेल टॅक्‍स' भरण्याच्या नोटिशी पाठवल्या आहेत. या करातून वगळण्याची मागणी नवउद्यमींनी सरकारकडे केली होती. 

केवळ 91 नवउद्यमींना कर सवलती -
देशात जवळपास 30 हजार नवउद्यमी आहेत; मात्र त्यातील 16 हजार नवउद्यमींना औद्योगिक धोरणे आणि प्रोत्साहन मंडळाचा दर्जा मिळाला आहे आणि केवळ 91 नवउद्यमींना कर सवलतींचा लाभ मिळत आहे. 

पुरेशा निधीमुळे नवउद्यमींच्या प्रगतीत अडथळे निर्माण झाले होते. एंजेल गुंतवणूकदार, भागधारक आणि नवउद्यमींशी चर्चा केल्यानंतर नवउद्यमीच्या व्याख्येचा विस्तार करण्यात आला आहे. याशिवाय कर सवलतीची नियमावली शिथिल करण्यात आली आहे. 
- सुरेश प्रभू, वाणिज्य आणि उद्योगमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com