आता यंत्र ठेवणार चालकाच्या डुलकीवर 'नजर'

वृत्तसंस्था
शनिवार, 13 जुलै 2019

वाहन चालविताना चालकाला डुलकी लागल्याने युमना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात होऊन 29 प्रवासी ठार झाल्याची घटना नुकतीच घडली. त्या पार्श्‍वभूमीवर द्रुतगती मार्गावरील अपघात टाळण्यासाठी येथील एसटी महामंडळाने ही योजना आखली आहे.

लखनौ : द्रुतगती मार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी उत्तर प्रदेश राज्य परिवहन मंडळ एक खास उपक्रम सुरू करणार आहे. यानुसार वाहनांमध्ये एक खास उपकरण ठेवण्यात येणार आहे. दीर्घ पल्ल्याच्या मार्गावर चालकाला येणारी डुलकी हे यंत्र रोखणार आहे. 

वाहन चालविताना चालकाला डुलकी लागल्याने युमना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात होऊन 29 प्रवासी ठार झाल्याची घटना नुकतीच घडली. त्या पार्श्‍वभूमीवर द्रुतगती मार्गावरील अपघात टाळण्यासाठी येथील एसटी महामंडळाने ही योजना आखली आहे. यात यंत्रासोबत विशेष सेन्सरही असणार आहे. वाहन चालविताना चालकाच्या डोळ्यावर झोप आली, तर या यंत्रातून 'बीप' असा आवाज येऊन लाल दिवा लागेल. यामुळे चालक सावध होईल.

तसेच या यंत्राद्वारे वाहनाचा वेग आपोआप कमी होऊन आपत्कालीन ब्रेकच्या मदतीने वाहन थांबेल. ही माहिती एसटीचे प्रादेशिक व्यवस्थापक पल्लव बोस यांनी दिली. हे उपकरण इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित असून, महाराष्ट्रातील पुण्यातील कंपनी त्याचे उत्पादन करणार आहे. या उपकरणाची किंमत 40 हजार रुपये असेल.

पथदर्शी प्रकल्पात हे उपकरण लखनौ-नेपाळगंज मार्गावरील दोन व लखनौ-गोरखपूर मार्गावरील दोन अशा चार बसमध्ये बसवून चाचणी घेण्यात आली आहे. त्याचे परिणाम चांगले आल्याने यासंबंधीचा प्रस्ताव उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाचे कार्यकारी संचालक धीरज साहू यांच्याकडे पाठविला आहे. साहू यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे बोस यांनी सांगितले. 

उपकरणाची वैशिष्ट्ये :
- 'बीप' असा आवाज करीत लाल दिवा लागेल 
- चालकाचा प्रतिसाद मिळेपर्यंत 'बीप' आवाज येत राहणार 
- बसचे ब्रेक आपोआप लागून वेग मंदावणार 
- रस्त्यावरही लक्ष ठेवणार 
- अतिवेग व ओव्हरटेक करताना चालकाला सावध करणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UP State Transport used new machine for avoid accidents