esakal | राज्यात दिवसाला 20 हजार रुग्ण सापडतील; केरळच्या आरोग्य मंत्र्यांची भीती
sakal

बोलून बातमी शोधा

Corona_55.jpg

कोरोना विषाणूविरोधात लढण्यात एकेकाळी यशस्वी ठरलेले केरळ राज्य सध्या चाचपडताना दिसत आहे.

राज्यात दिवसाला 20 हजार रुग्ण सापडतील; केरळच्या आरोग्य मंत्र्यांची भीती

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

तिरुवनंतपुरम- कोरोना विषाणूविरोधात लढण्यात एकेकाळी यशस्वी ठरलेले केरळ राज्य सध्या चाचपडताना दिसत आहे. राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढण्याची शक्यता केरळच्या आरोग्यमंत्री केके. शैलेजा यांनी व्यक्त केली आहे. केरळमध्ये दररोज 10 ते 20 हजार रुग्ण सापडतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. 

Coronavirus India Updates : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय, पण...
 

ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. या दोन महिन्यात दिवसाला 10000 ते 20000 कोरोनाबाधित रुग्ण सापडतील, असं शैलेजा एका व्हिडिओमध्ये म्हणाल्या आहेत. कोरोना महामारीला थोपवण्यासाठी राज्यातील तरुणांनी 'कोविड ब्रिज' मोहिमेत भाग घ्यावा, असंही त्या म्हणाल्या आहेत. 

कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यानंतर मृत्यूदरामध्येही मोठी वाढ होईल. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. यासाठी सर्व लोकांनी सहकार्य करावे.  लोकांनी जाहीर केलेले आरोग्य प्रोटोकॉल कटाक्षाने पाळावेत. नियमित मास्क वापरणे, वारंवार हात धूणे आणि सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. सर्वांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास आपण विषाणूची साखळी तोडू शकू, असं शैलेजा म्हणाल्या आहेत.  

भारतातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण 30 जानेवारी रोजी केरळमध्ये सापडला होता. चीनच्या वुहान शहरातून भारतात आलेल्या एका वैद्यकीय विद्यार्थीनीला कोरोनाची बाधा झाली होती. तेव्हापासून देशात कोरोनाचा संसर्ग सुरु झाला. कोरोनाचा दुसरा आणि तिसरा रुग्णही केरळमध्ये सापडला होता. पहिले तिन्ही रुग्ण चीनच्या वुहान शहरातून परत आले होते. 

इस्त्रायल-युएई मैत्रीमुळे भारताशी पंगा घेणाऱ्या राष्ट्राला दणका बसणार

कोरोनाचा संसर्ग केरळमध्ये सुरु झाला असला तरी विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात राज्याला यश आले होते. 5 मे पर्यंत राज्यात केवळ 500 रुग्ण आढळून आले होते. मे 27 पर्यंत राज्यात 1 हजार रुग्ण झाले. देशातील इतर राज्यांशी तुलना करता ही आकडेवारी फार कमी होती. त्यानंतर केरळमध्ये कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली. 4 जूलै रोजी राज्यात 5 हजार कोरोनाबाधित झाले, तर 16 जूलै रोजी राज्याने 10 हजारांचा आकडा पार केला. त्यानंतर 12 दिवसात कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट म्हणजे 20 हजार झाली. सध्या राज्यात 39,708 कोरोनाग्रस्त (13 ऑगस्ट) आहेत. गेल्या 24 तासात राज्यात 1,564 रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत केरळमध्ये 123 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

(edited by-kartik pujari)