"स्टॅच्यू ऑफ युनिटी'चे 31 ऑक्‍टोबरला अनावरण 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 जुलै 2018

पुतळ्यासाठी... 

90 हजार टन सिमेंट 

25 हजार टन लोखंड. 

250 अभियंते 

2889 कोटी रुपये एकूण प्रकल्पाचा खर्च 

2300 कोटी रुपये आतापर्यंत झालेला खर्च 

अहमदाबाद- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या "स्टॅच्यू ऑफ युनिटी' या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 31 ऑक्‍टोबरला होणार आहे. जगातील सर्वांत उंच ठरणारा हा पुतळा 182 मीटर उंचीचा आहे. यानिमित्ताने लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचारशिंगही मोदी गुजरातेतून फुंकतील. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी या प्रकल्पाचे स्वप्न पाहिले होते. सरदार पटेलांच्या 143 व्या जयंतीदिनी त्याची पूर्ती होईल. 

नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवराजवळील केवडिया कॉलनीतील साधू बेटावर हा पुतळा उभारला जात आहे. मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी नुकतीच कामाच्या प्रगतीची पाहणी केली. 90 हजार टन सिमेंट आणि 25 हजार टन लोखंड वापरून हा पुतळा उभारला जात आहे. 250 अभियंते या कामात गुंतले असून, आतापर्यंत पुतळ्याचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. 

पुतळ्याचे देशार्पण हा केवळ समारंभ नसून, राज्य सरकारविरुद्ध उभ्या ठाकलेल्या पाटीदार समाजाला चुचकारण्याचे राजकारणही त्यात आहे. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये ओबीसी आरक्षण मिळावे, अशी पाटीदारांची मागणी आहे. "लोह पुरुषा'च्या पुतळ्यामुळे पाटदारांचा राग शांत होण्याचा सरकारचा अंदाज आहे. या पुतळ्याची कोनशीला मोदी यांनी मुख्यमंत्री असताना 31 ऑक्‍टोबर 2013 रोजी रचली. तीन हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प "पीपीपी' पद्धतीचा आहे. "एल अँड टी' आणि सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेड (एसएसएनएनएल) यांना पुतळ्याचे काम देण्यात आले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या पुतळ्याभोवतीच्या संकुलात एक गॅलरी, आदिवासी संग्रहालय तसेच सरदार पटेलांच्या जीवनावरील लेसर लाइट अँड साउंड शो असतील.

पुतळ्यासाठी... 

90 हजार टन सिमेंट 

25 हजार टन लोखंड. 

250 अभियंते 

2889 कोटी रुपये एकूण प्रकल्पाचा खर्च 

2300 कोटी रुपये आतापर्यंत झालेला खर्च 
 

Web Title: Statue of Unity unveiled on October 31