मतसंग्राम : विद्यासागरांचा पुतळा तृणमूलच्या मदतीला... 

मतसंग्राम : विद्यासागरांचा पुतळा तृणमूलच्या मदतीला... 

बंगाली माणूस सांस्कृतिक, वैचारिक, ऐतिहासिक संचितांबद्दल प्रचंड जागरूक असतो. प्रत्येक बंगालीला या आयकॉनचा प्रचंड अभिमान असतो. त्यावरच त्या दिवशीच्या रोड शोवेळी आघात झाल्याने वातावरण बदलले आहे. ते मतपेटीतून व्यक्त होऊ शकते... 

राजकारणात संधी ओळखणे आणि तिच्यावर स्वार होणे महत्त्वाचे असते. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी रात्री हेच केले. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोमध्ये राडा झाल्यानंतर आणि विशेषत: कोलकता विद्यापीठ परिसरात विद्यासागर महाविद्यालयात थोर समाजसुधारक ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड झाल्यानंतर काही वेळात ममतादीदी तिथे पोचल्या.

पुतळ्याचे भग्नावशेष पदरात बांधून घेतले. बुधवारी विद्यापीठ परिसरातून कॉलेज रोडवरून श्‍याम बाजारापर्यंत निषेध यात्रा काढली. हे पुतळा प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून अमित शहा, तसेच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सगळे बडे नेते तो पुतळा भाजपच्या नव्हे; तर तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच फोडल्याचे सिद्ध करण्यात व्यग्र आहेत. आतापर्यंतच्या प्रचारात व मतदानावेळी तृणमूलच्या गुंडांनी बंगालमध्ये अक्षरश: धुडगूस घातला आहे. त्याची सहानुभूती भाजपला मिळत असताना पुतळा प्रकरण घडल्याने भाजपची त्रेधातिरपीट उडाली. कारण, तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडिओंसह अनेक पुरावे तोडफोडीचा संशय भाजप कार्यकर्त्यांवरच व्यक्‍त करणारे आहेत. 

हे सगळे व्हिडिओ पाहिल्यावर आणि कोलकत्यामधील काही जणांशी बोलल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली, की अमित शहांच्या रोड शोला मिळालेला प्रतिसाद खूप मोठा होता. यात स्थानिक समर्थकांसोबतच देशाच्या विविध भागांतून, विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेशातून बंगालमध्ये प्रचारासाठी आलेले कार्यकर्तेही मोठ्या संख्येने होते. "पगडी पहने हुए लोग आपको कोलकता में नहीं मिलेंगे,' अशा शब्दांत स्थानिक मंडळीही बाहेरच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती अधोरेखित करतात. रोड शो पुढे निघून गेल्यानंतर विद्यासागर महाविद्यालयात राडा झाला. त्या वेळी आत घुसलेल्या अशा कार्यकर्त्यांना विद्यासागर कोण, हे माहिती असणे शक्‍य नव्हते. 
विद्यासागरांचा पुतळा बंगालमधील शेवटच्या सातव्या टप्प्यात रविवारी (ता. 19 मे) होणाऱ्या नऊ मतदारसंघांच्या मतदानात खूप महत्त्वाचा आहे.

दक्षिण आणि उत्तर कोलकत्याशिवाय डमडम, बारासत, बशीरहाट, जयनगर, मथुरापूर, डायमंड हार्बर आणि जादवपूर हे सर्व मतदारसंघ कोलकत्याला लागून आहेत. या भागात सुशिक्षित मध्यमवर्गीय मतदार बहुसंख्येने आहेत. पोटापाण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहारमधून कोलकत्यात आलेल्या हिंदीभाषकांसोबत हा मध्यमवर्ग आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न सुरवातीपासून भाजपने केले. मुळात इथला सुशिक्षित मध्यमवर्ग हा परंपरेने डाव्या आघाडीचा मतदार. या वेळी प्रमुख आव्हान भाजपचेच आहे, हे स्पष्ट झाल्यापासून डाव्या आघाडीची मते भाजपकडे वळतील, असा अंदाज आहे. या व्होट ट्रान्स्फरला ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळा प्रकरणाने धक्‍का बसला आहे. 

बंगाली माणूस आपल्या सांस्कृतिक, वैचारिक, ऐतिहासिक संचितांबद्दल प्रचंड जागरूक असतो. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस, राजा राममोहन रॉय, ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्यापासून ते अलिकडे कला, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर ही बंगालने देशाला दिलेली मोठी देन आहे आणि प्रत्येक बंगाली माणसाला या आयकॉनचा प्रचंड अभिमान असतो. हीच बंगालची अस्मिता आहे. तिच्यावर स्वार होण्याची संधी ममतांनी साधली आहे. 2014 च्या निवडणुकीत डाव्या आघाडीला मिळालेल्या मतांपैकी दहा टक्‍के मते जरी मिळाली, तर भाजप दुहेरी आकडा गाठेल आणि तृणमूलच्या खासदारांची संख्या तीसच्या आत येईल. विद्यासागर पुतळा प्रकरणामुळे डाव्यांची भाजपकडे वळणारी बरीच मते थांबू शकतात. 

प. बंगालमधील 2014 ची स्थिती 

पक्ष मतांची टक्‍केवारी मतांची वाढ/घट जिंकलेल्या जागा 2009 च्या तुलनेत वाढ/घट 
तृणमूल कॉंग्रेस 39.05 टक्‍के +8.13 टक्‍के 34 +15 
डावी आघाडी 29.71 टक्‍के -15.10टक्‍के 2 -13 
भाजप 17.02 टक्‍के +10.88 टक्‍के 2 +1 
कॉंग्रेस 9.58 टक्‍के - 3.85 टक्‍के 4 -2 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com