दारुविक्रीबाबत न्यायालयाच्या निर्णयाचे काटेकोर पालन करा: आदित्यनाथ

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 एप्रिल 2017

निवासी परिसरात हलविण्यात येत असलेल्या दारुविक्रीच्या दुकानांविरोधात महिलांनी केलेल्या निदर्शनांची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. दारुविक्रीबाबत न्यायालयाच्या निर्णयाचे काटेकोरपणे पालक करावे अशी सूचना आदित्यनाथ यांनी दिली आहे.

लखनौ (उत्तर प्रदेश) - निवासी परिसरात हलविण्यात येत असलेल्या दारुविक्रीच्या दुकानांविरोधात महिलांनी केलेल्या निदर्शनांची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. दारुविक्रीबाबत न्यायालयाच्या निर्णयाचे काटेकोरपणे पालक करावे, अशी सूचना आदित्यनाथ यांनी दिली आहे.

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून 500 मीटर अंतरापर्यंत दारुविक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशमधील काही भागात महामार्गांवरील दारुविक्रीची दुकाने निवासी परिसरात हलविण्यात येत असल्याची तक्रार महिलांनी केली होती. या प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी महिलांनी निदर्शनेही केली होती. त्यानंतर मुख्य सचिव राहुल भटनागर यांनी उपविभागीय दंडाधिकारी, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि पोलिस आयुक्तांना दारुविक्रीचे दुकान निवासी परिसरात हलविले जाणार नाही, याची काळजी घेण्याचे सूचना दिल्या आहेत. "निवासी परिसर, शाळा, महाविद्यालये आणि धार्मिक स्थळांजवळ दारुविक्रीची दुकाने हलवू नयेत, याबाबत अधिकारी आणि पोलिसांना कडक सूचना दिल्या आहेत', अशी माहिती याबाबत बोलताना भटनागर यांनी दिली.

"दारुविक्री केंद्रांच्या बाबतीत न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे संपूर्णपणे आणि कडक पालन करण्यात यावे', असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरद्वारे दिली आहे.

Web Title: Strictly implement court orders about liquor sale : Yogi