काश्‍मीर खोऱ्यातील बंद सुरूच

पीटीआय
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

आता काश्‍मीर खोऱ्यातील संघर्षामध्ये शैक्षणिक संस्थांना सातत्याने लक्ष्य केले जात असून, आज आणखी एक शैक्षणिक संस्था जाळण्यात आली. यामुळे आगीत भस्मसात झालेल्या राज्यातील शैक्षणिक संस्थांची संख्या आता 22वर पोचली आहे. काश्‍मीर सरकारने पुढील महिन्यामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याचे नियोजन आखले असून, विद्यार्थ्यांनी मात्र अभ्यास पूर्ण झाला नसल्याने या परीक्षा पुढे ढकलल्या जाव्यात, अशी मागणी केली आहे.

श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यातील बंद आज सलग 114 व्या दिवशीही कायम राहिल्याने सामाजिक जनजीवन विस्कळित झाले. एका नागरिकाच्या हत्येचा निषेध करण्यासाठी फुटीरतावाद्यांनी हा बंद पुकारला होता. काही किरकोळ दुकाने वगळता शहरामधील संपूर्ण बाजारपेठ बंदच होती. पेट्रोल पंपदेखील बंद राहिल्याने रस्त्यांवर वाहनांची फारशी वर्दळ नव्हती.

सुरक्षिततेच्या कारणास्तव संवेदनशील भागांमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काश्‍मीरमधील या संघर्षामध्ये आतापर्यंत पाच हजारांपेक्षाही अधिक सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. काश्‍मीरमधील आंदोलक आता शैक्षणिक संस्थांना लक्ष्य करत असल्याने हुर्रियत कॉन्फरन्स आणि काश्‍मीर आर्थिक आघाडीने याचा निषेध केला आहे.

जाळपोळ संशयास्पद
आतापर्यंत राज्यातील 21 पेक्षाही अधिक शिक्षणसंस्थांना फुटीरतावाद्यांनी आगी लावल्या असून, याचा सर्वाधिक फटका खासगी शिक्षण संस्थांना बसला आहे. यंदा 9 जुलै रोजी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीमध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्‍या बुऱ्हाण वणी ठार झाल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यामध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला होता. या आंदोलनामध्ये सुरवातीस व्यापारपेठांना लक्ष्य करण्यात आले होते; पण आता काही समाजकंटकांनी शिक्षणसंस्थांना लक्ष्य करायला सुरवात केली आहे.

पालकांकडून निषेध
तीन महिन्यांपासून काश्‍मीर खोऱ्यामध्ये बंद सुरू असल्याने याचा मोठा फटका शैक्षणिक संस्थांना बसला आहे, यामुळे सुरवातीस काहीसा सौम्य असलेला पालकांचा निषेधाचा सूर आता आक्रमक झालेला दिसून येतो. श्रीनगरमध्ये आज काही पालकांनी फुटीरतावाद्यांच्याविरोधात जोरदार निदर्शने केली. या आंदोलनाचे लोण संपूर्ण राज्यामध्ये पसरल्यास फुटीरतावाद्यांची पंचाईत होऊ शकते. गिलानींची नात परीक्षा देऊ शकते मग आमच्या मुलांचे भवितव्य का उद्‌ध्वस्त केले जात आहे? असा सवाल आंदोलकांनी केला.

काश्‍मीर खोऱ्यात फक्त फुटीरतावाद्यांनाच हिंसाचार हवा आहे. आता सामान्य लोकांनीच तेथील अराजकतेविरोधात रस्त्यावर उतरावे.
- सतीश बोरचाटे, वाचक

 

Web Title: strike continues in kashmir