पंजाब, हरियाणात शेतकरी संपाला धार

वृत्तसंस्था
रविवार, 3 जून 2018

शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपाला पंजाब, हरियाणासह विविध राज्यांत दुसऱ्या दिवशीही चांगलीच धार होती. या राज्यातील प्रमुख शहरांकडे जाणारा दूध, भाजीपाला अनेक भागांत रोखण्यात आला. राष्ट्रीय किसान महासंघाने दहा दिवस पुकारलेल्या या आंदोलनात सातपेक्षा अधिक राज्यांतील शेतकऱ्यांनी अनेक भागांत रास्ता रोको आंदोलन केले. 

चंडीगड : शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपाला पंजाब, हरियाणासह विविध राज्यांत दुसऱ्या दिवशीही चांगलीच धार होती. या राज्यातील प्रमुख शहरांकडे जाणारा दूध, भाजीपाला अनेक भागांत रोखण्यात आला. राष्ट्रीय किसान महासंघाने दहा दिवस पुकारलेल्या या आंदोलनात सातपेक्षा अधिक राज्यांतील शेतकऱ्यांनी अनेक भागांत रास्ता रोको आंदोलन केले. 

केंद्र आणि राज्य सरकारचे शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध या वेळी करण्यात आला. पहिल्या दिवशी शहरातील भाजीपाला विक्री दरातही फरक जाणवला नसला, तरी दुसऱ्या दिवशी प्रतिकिलो 10 ते 20 रुपयांनी दरात वाढ झाली. बटाटा, ढोबळी मिरची, कारले, काकडी आदींचा काही प्रमाणात तुटवडा जाणवू लागला. दररोज येणाऱ्या आवकेत परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले, तसेच संप सुरूच राहिल्यास आगामी काही दिवसांत दरात आणखी वाढ होण्याची शक्‍यता व्यक्त केली. 

पंजाबातील नाभा, लुधियाना, मुक्तसर, तरण तारण, नांगल, भटिंडा आणि फिरोजपूर या भागात आंदोलनाचा जोर अधिक आहे. शेतकऱ्यांनी शहरांकडे जाणारा भाजीपाला आणि दूध रोखले आहे. भटिंडा येथे चार आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. वरखा येथील दूध प्रकल्पातून दूध वितरणास ते विरोध करीत होते. किसान एकता मंच आणि राष्ट्रीय किसान महासंघाच्या नेतृत्वाखाली येथे 1 ते 10 जूनदरम्यान आंदोलन होत आहे.

Web Title: strong Farmers movement in Punjab and Haryana