'इन्कलाब जिंदाबाद' विद्यार्थ्यांचे कपडे काढून आंदोलन 

टीम ई सकाळ
सोमवार, 16 डिसेंबर 2019

विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आज सकाळी थंडीच्या कडाक्‍यात जामियाच्या प्रवेशद्वारावर कपडे न घालता आंदोलन केले. 

नवी दिल्ली  - जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात आज विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आज सकाळी थंडीच्या कडाक्‍यात जामियाच्या प्रवेशद्वारावर कपडे न घालता आंदोलन केले. 

"इन्कलाब जिंदाबाद'
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून काल जामिया मिलियात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्याला हिंसाचाराचे गालबोट लागले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या वेळी झालेल्या धुमश्‍चक्रीत पोलिसांनी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण केली. पोलिसांच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आज सकाळी जामिया मिलियाच्या सुमारे दहा विद्यार्थ्यांनी "इन्कलाब जिंदाबाद'च्या घोषणा देत मोर्चा काढला. या वेळी एका विद्यार्थ्याने सांगितले की, काल पोलिसांनी आमच्या सहकाऱ्यांना बेदम मारहाण केली. कॅम्पसमधील शौचालय, ग्रंथालयातही घुसखोरी केली. मुलींनाही मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्ली पोलिसांच्या गुंडगिरीविरोधात आज सकाळी आंदोलन केल्याचे विद्यार्थ्याने सांगितले. सोशल मीडियावरूनही विद्यार्थ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, विद्यापीठाच्या कुलगुरू नजमा अख्तर यांनी अद्याप घटनास्थळी भेट दिली नसल्याचे आणि विद्यार्थ्यांची भेट घेतली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. अमिना नॉम्बगरी आणि नसीम नॉंम्बगरी या शिलॉंगच्या रहिवासी आहेत. त्या म्हणाल्या. या आंदोलनामुळे ईशान्य भारत पेटला आहे. देशाच्या एकात्मकतेला या कायद्यामुळे धोका निर्माण झाला आहे. पोलिसांनी बळाचा वापर करताना दोन अपंग विद्यार्थ्यांवरही हल्ला केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबतचा व्हीडिओ त्यांनी शेअर केला आहे.

हेही वाचा : भाजपकडून शिवाजी महाराजांच्या नावाला गालबोट

जामियात स्थिती तणावपूर्ण 
जामिया मिलिया इस्लामियात काल झालेल्या हिंसाचारानंतर सोमवारी सकाळीदेखील स्थिती तणावपूर्ण होती. तणावाच्या पार्श्‍वभूमीवर काही विद्यार्थ्यांनी घरचा रस्ता धरल्याचे चित्र आहे. पोलिसांच्या कालच्या या भूमिकेचे दिल्लीत तीव्र पडसाद उमटले आहेत. तणाव कायम असल्याने काही विद्यार्थ्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने पाच जानेवारीपर्यंत हिवाळी सुटी झाल्याने परीक्षादेखील स्थगित केल्या आहेत.

हेही वाचा :  राहुल-सावरकर-रेप इन इंडिया, काय आहे यामागचे सत्य?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students protest shirtless near Jamia Millia Islamia University Delhi