'भाजपचे खासदारच म्हणतात, सरकार पाडू'

वृत्तसंस्था
शनिवार, 8 डिसेंबर 2018

''राम मंदिर उभारणीला विरोध केल्यास केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील आदित्यनाथ हे दोन्ही सरकार पाडू''.

- सुब्रमण्यम स्वामी, खासदार

नवी दिल्ली : राम मंदिराच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण तापत आहे. त्यानंतर आता भाजपच्याच खासदाराने राम मंदिरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडले. ''राम मंदिर उभारणीला विरोध केल्यास केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील आदित्यनाथ हे दोन्ही सरकार पाडू'', असा इशारा राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आज (शनिवार) दिला. 

नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) एका कार्यक्रमात सुब्रमण्यम स्वामी बोलत होते. ते म्हणाले, ''राम मंदिर उभारणीला विरोध केल्यास केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील आदित्यनाथ हे दोन्ही सरकार पाडू. राम मंदिर उभारणीच्या प्रकरणावर जानेवारी महिन्यापासून सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर आता आम्ही दोन आठवड्यात जिंकू. केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार हे दोन्ही पक्षकार आमचे विरोधक आहेत. मला विरोध करण्याची त्यांच्यात हिंमत आहे का? जर त्यांनी मला विरोध केला तर मी सरकार पाडेन. मात्र, ते मला विरोध करणार नाहीत, हे मला माहीत आहे''.

दरम्यान, सुब्रमण्यम स्वामीे यांच्याकडून यापूर्वीही अशीच विधाने करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांनी राम मंदिराच्या उभारणीवरून पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. 

Web Title: Subramaniam Swamy warned Narendra Modi government on Ram Temple issue