सुब्रमण्यम स्वामींचे मालदीवबाबत वादग्रस्त ट्विट

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

'मालदीवमध्ये निवडणूकीवेळी काही गोंधळ झाला तर, भारताने त्यांच्यावर आक्रमण केले पाहिजे' असे ट्विट सुब्रमण्यम स्वामींनी 24 ऑगस्टला केले होते. यावरून मालदीव सरकारने संताप व्यक्त केला आहे. 

नवी दिल्ली : भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी हे त्यांच्या वक्तव्यांमुळे कायमच वादाच्या भोवऱ्यात असतात. मालदीवच्या निवडणूकीबाबत केलेल्या एका ट्विटमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 'मालदीवमध्ये निवडणूकीवेळी काही गोंधळ झाला तर, भारताने त्यांच्यावर आक्रमण केले पाहिजे' असे ट्विट 24 ऑगस्टला केले होते. यावरून मालदीव सरकारने संताप व्यक्त केला आहे. 

मालदीव व भारताचे संबंध चांगले असल्याने या ट्विटमुळे मालदीव नाराज आहे. नाराज मालदीवने भारताचे राजदूत अखिलेश मिश्रा यांना या प्रकाराबाबत रविवारी (ता. 26) समन्स पाठवला. स्वामींना असे ट्विट करणे हे आश्चर्यचकीत करणारे आहे, तसेच चिंताजनक आहे असे मालदीव सरकारने म्हटले. 

भारत सरकारने या ट्विटवर काही भाष्य न करता, हे स्वामी यांचे वैयक्तिक मत आहे व त्यापासून त्यांना रोखता येणार नाही, असे सांगितले. मालदीवमधील नागरिकांनी या ट्विटवर नाराजी व्यक्त केली असून, आम्हाला तुमची मदत नको व आम्ही कोणालाही आमच्यावर हल्ला करू देणार नाही, अशा आशयाच्या प्रतिक्रिया मालदीवच्या नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. 

Web Title: subramanian swamy s controversial tweet on maldives