थ्रीडी प्रिंटरद्वारे चक्क जबड्याची निर्मिती

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

एका 53 वर्षीय व्यक्तीचा जबडा थ्रीडी प्रिंटरच्या मदतीने तयार करण्यात भारतीय वंशाच्या लंडनमधील शल्यविशारदाला यश आले आहे. संबंधित रुग्णाच्या एका पायाच्या हाडाचा वापर जबडा तयार करण्यासाठी करण्यात आला आहे.

लंडन - एका 53 वर्षीय व्यक्तीचा जबडा थ्रीडी प्रिंटरच्या मदतीने तयार करण्यात भारतीय वंशाच्या लंडनमधील शल्यविशारदाला यश आले आहे. संबंधित रुग्णाच्या एका पायाच्या हाडाचा वापर जबडा तयार करण्यासाठी करण्यात आला आहे.

डॉ. दया गहीर असे या शल्यविशारदाचे नाव असून, इंग्लंडमधील पश्‍चिम मिडलॅंडमधील रॉयल स्टोक विद्यापीठ रुग्णालयात ते कार्यरत आहेत. भारतीय वंशाच्या डॉ. दया यांचा चेहरा, डोके आणि मानेच्या शस्त्रक्रिया करण्यात विशेष हातखंडा आहे. दरवर्षी ते सुमारे 40 अवयवांची पुनर्रचना करतात. डॉ. दया यांच्या रुग्णालयातील सुमारे एक लाख 86 हजार 871 अमेरिकी डॉलर किमतीच्या थ्रीडी प्रिंटरसाठी आवश्‍यक विशेष सॉफ्टवेअर मागील वर्षीच खरेदी केले आहे. या थ्रीडी प्रिंटरमुळे डॉ. दया यांचे काम अधिक सुलभ झाले आहे. शस्त्रक्रियांसाठी लागणारे साहित्यही या थ्रीडी प्रिंटरच्या माध्यमातून तयार केले जाते. तसेच शस्त्रक्रियेमध्येही त्याचा उपयोग केला जातो.

आम्ही डोके आणि मानेतील अवयवांच्या दरवर्षी कमीतकमी 40 पुनर्रचना करतो. त्यापैकी दहा ते पंधरा टक्के वेळा थ्रीडी प्रिंटरचा वापर करतो, अशी माहिती डॉ. दया यांनी स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना दिली. रुग्णाच्या पायातील एखादे हाड घेतले जाते आणि त्याला हवा तो आकार दिला जातो. खराब झालेल्या हाडाच्या जागेवर हे नव्याने पुनर्रचना करण्यात आलेले हाड बसविले जाते. त्यासाठी पायाच्याच त्वचेचा वापर केला जातो. अशा प्रकारच्या अतिशय अवघड असलेल्या शस्त्रक्रियेसाठी दहा ते बारा तासांचा कालावधी लागले, अशी माहिती डॉ. दया यांनी दिली. स्टीफन वॉटरहाउस यांच्या जबड्याच्या हाडाचे घशावरील कर्करोगाच्या उपचारामुळे तुकडे झाले होते. डॉ. दया यांनी थ्रीडी प्रिंटरच्या मदतीने स्टीफन यांच्या पायातील हाडापासून जबडा तयार केला असून, तो शस्त्रक्रियेद्वारे नुकताच बसविण्यात आला असल्याचा खुलासाही डॉ. दया यांनी या वेळी केला.

ब्रिटनमध्ये फक्त डॉ. दया हे काम करत असलेल्या रॉयल हॉस्पिटलकडेच अशा प्रकारचे थ्रीडी प्रिंटर असून, रुग्णालयाने ते दोन वर्षींपूर्वी खरेदी केले आहे. अशा प्रकारची सुविधा नसल्यामुळे रुग्णांना ब्रिटनमधून जर्मनीला पाठवावे लागत होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असे आणि वेळही खूप जात होता. कर्करोगाच्या रुग्णांना एवढा वेळ खर्च करणे परवडणारे नाही. जबड्याची शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या वॉटरहाउस यांची प्रकृती आता उत्तम असल्याचेही डॉ. दया यांनी सांगितले.

Web Title: Successful production of human jaw using 3D printer