नागपुरातील भेटीची गोव्यात चर्चा

Sudin Dhavlikar
Sudin Dhavlikar

पणजी : गोव्यापासून १ हजार ११० किलोमीटरवरील नागपूर येथे काल गोव्याच्या राजकारणावरील गरमागरम चर्चा रंगली होती. निमित्त होते रोड काँग्रेसचे. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर आणि केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीत राजकीय चर्चा झाली आणि त्याची खबर पार गोव्यापर्यंत पोचली.

या परिषदेच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी काही बैठक कक्ष आरक्षित कऱण्यात आले होते. त्यापैकी एका कक्षात या दोन्ही नेत्यांनी बैठक झाल्याची माहिती नागपूरातून मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या राज्याच्या राजकीय परिस्थितीवर या दोन्ही नेत्यांत चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात सध्या सरकारविरोधी वातावरण वाढू लागले आहे. त्याचा फटका भाजपसह सरकारमधील सहभागी घटक पक्षांनाही कसा बसणार याची या बैठकीत चर्चा झाली आहे.

राज्यात भाजपला गेल्यावर्षीच्या निवडणुकीत केवळ १३ जागा मिळाल्या होत्या.त्यावेळी रातोरात भाजपने गडकरी यांना गोव्यात पाठवले होते.त्यामुळे ते गोव्यातील आघाडी सरकारचे शिल्पकार मानले जातात. मध्यंतरी सरकारमधील घटक पक्षांनी खाणकामावरून ओरड करण्यास सुरवात केल्यानंतर एका हॉटेलमध्ये बैठका घेून गडकरी यांनी त्यांची नाराजी दूर केली होती. अलीकडच्या राजकीय घडामोडींपासून गडकरी थोडे दूर असल्याचे जाणवत होते. मात्र कालच्या बैठकीने पडद्याआड बऱ्याच हालचाली सुरु असल्याच्या संशयाला पृष्टी मिळाली आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असल्याने मुख्यमंत्रीपदाचा हंगामी ताबा मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे द्यावा अशी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी जाहीरपणे केली आहे. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी ढवऴीकर यांची भेट घेतली असली तरी मुख्यमंत्रीपदाऐवजी काही खाती इतर मंत्र्याना देण्याचा भाजपचा विचार आहे. त्यावरून मगो व भाजपमध्ये तणाव वाढू शकतो. त्या साऱ्याची दखल आजच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

आपणास मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे असे सुदिन ढवळीकर यांनीही यापूर्वी सांगितले आहे. गडकरी यांच्याशी त्यांचे वैयक्तीक संबंध आहेत. त्यामुळे कालच्या या भेटीकडे केवळ दोन मंत्र्यांतील औपचारीक भेट असे पाहता येणार नाही. त्यात नेमकी काय चर्चा झाली त्यातून पुढे काय निष्पन्न होणार यासाठी ११ डिसेंबरनंतरच्या आठवड्याची वाट पहावी लागणार आहे. मात्र या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या एवढे नक्की!

साखळी येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताने गेलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर व प्रदेश सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी काल माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांची घेतलेली भेटही आज चर्चेत होती. त्या भेटीची चर्चा आज समाज माध्यमांवर रंगली होती. कॉंग्रेसचे दोन आमदार भाजपमध्ये आल्यानंतर भाजप पुढे कोणती खेळी खेळणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. याचदरम्यान आपण अन्य कोणत्या पक्षात जाणार नाही असे राणे यांनी ठणकावून सांगितले होते. तरीही भाजपचे नेते राणे यांनी भेटल्याने त्याकडे राजकीय चष्म्यातून पाहिले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com