गोव्यातील साखर कारखाना 15 डिसेंबरपर्यंत सुरू?

गोव्यातील साखर कारखाना 15 डिसेंबरपर्यंत सुरू?

पणजी : गोव्यातील एकमेव असलेला, सरकारी मालकीचा संजीवनी साखर कारखाना सुरू होण्यास 15 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना वाट पहावी लागणार आहे. सध्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार कारखाना बंद आहे. दरवर्षी तीन महिन्यांसाठी कारखाना सुरू केला जातो.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार सांडपाणी व वायू उत्सर्जनावर देखरेख ठेवणारी यंत्रणा बसवण्यासाठी संजीवनी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने तयारी सुरु केली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आपल्या आदेशाला स्थगिती देणार नाही  हे लक्षात आल्यावर काऱखान्याकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी येत्या पाच डिसेंबरपर्यंत कारखाना सुरु झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मात्र कारखान्याने आता ही यंत्रणा पुरविणाऱ्या तीन पुरवठादारांकडून देकार घेतले आहेत. सरकारी नियमानुसार आठवडाभरात त्यावर निर्णय होईल. त्याशिवाय कंपनीला ही उपकरणे बसविण्याचे आदेश दिल्यानंतर ती उपकरणे गोव्यात उपलब्ध होण्यास आठवडाभराचा कालावधी लागू शकतो. जाणकारांच्या म्हणण्यानुसार ही उपकरणे बसवण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागतो. घाईघाईने हे काम केले तरी किमान पाच दिवस तरी लागतील. हा सारा वेळ जमेस धरला तर संजीवनी साखर कारखाना सुरु होण्यास 15 डिसेंबर उजाडू शकतो.

गेल्या वर्षी ही यंत्रणा बसवण्याचा आदेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला होता. मात्र कारखान्याकडून चालढकल करण्यात आल्यानंतर आता यंत्रणा बसवेपर्यंत यंदाचा गळीत हंगाम सुरु करू नका असा आदेश दिला आहे. गोमन्तकने त्याबाबतचे वृत्त दिल्यानंतर शेतकऱ्यांना ते समजले आणि त्यांनी कारखान्यावर मोर्चा नेला होता. 5 डिसेंबरपर्यंत कारखाना सुरु कऱण्याची लेखी हमी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन स्थगित केले होते व नंतर आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा इशारा दिला होता.
सांग्याचे आमदार प्रसाद गावकर यांनी कारखान्यात गेल्या वर्षी उत्पादीत केलेली दीड लाख पोती साखर पडून असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सरकार याविषयी गंभीर नाही. शेतकऱ्यांन अन्य कारखान्याचा पर्याय नसल्याने सरकारने हा कारखाना सुरु करण्यासाठी पावले टाकली पाहिजेत. त्यांच्या या इशाऱ्यानंतर दिल्लीत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आपला आदेश स्थगित ठेवतो का यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र आताच पुन्हा तीन वर्षांसाठी मुदतवाढ मिळालेले मंडळाचे अध्यक्ष एस. पी. एस. परीहार यांनी या प्रश्नी बोटचेपी भुमिका घेण्यास सरळ नकार दिल्यानंतर यंत्रणा बसवण्याशिवाय पर्याय नाही असे कारखाना व्यवस्थापनाच्या लक्षात आले आणि यंत्रणा पुरवठादारांशी संपर्क साधण्यात आला आहे.

तातडीने ही यंत्रणा घ्यायची असल्याने तीन पुरवठादारांकडून देकार घेतले आहेत. त्यापैकी सर्वात कमी खर्चात यंत्रणा बसवून देणाऱ्या कंपनीस काम दिले जाणार आहे. मात्र अद्याप त्याविषयी निर्णय व्हायचा आहे अशी माहिती मिळाली आहे.

वायू उत्सर्जन व सांडपाणी यातील प्रदूषणावर लक्ष ठेवणारी यंत्रणा संजीवनी साखर कारखान्यात बसविल्यानंतर ती यंत्रणा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळाशी सलग्न करावी लागणार आहे. यंत्रणा कार्यान्वित झाल्याची खात्री झाल्यानंतरच मंडळ आपला काऱखाना बंद ठेवण्याचा आदेश मागे घेणार आहे. त्याआधी त्या यंत्रणेची चाचणी घेणेही आवश्यक आहे. त्यासाठी किमा्न 15 दिवसांचा कालावधी लागू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com