देशातील साखर निर्यात गोड वळणावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

प्रामाणिकपणे निर्यात करावी - पाटील
ब्राझील इथेनॉलकडे वळल्याने जागतिक बाजार वाढले आहेत. यामुळे निर्यातीला चांगली संधी उपलब्ध झाली आहे. जागतिकसह देशांतर्गत बाजारही वाढले पाहिजेत. यासाठी सर्व कारखान्यांनी सरकारने ठरवून दिलेला कोटा प्रामाणिकपणे निर्यात करावा; अन्यथा पुन्हा भाव खाली येतील, असे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

प्रतिक्विंटलचा दर २२८० रुपयांपर्यंत; जागतिक बाजारात उत्पादनात घट
सोमेश्‍वरनगर (जि. पुणे) - साखरेचे आंतरराष्ट्रीय दर मागील दोन वर्षांनंतर प्रथमच ३६७ डॉलर प्रतिटनावर पोचल्यामुळे भारतीय साखर उद्योगात उत्साह आहे. रुपयाची घसरणदेखील साखर उद्योगाच्या पथ्यावर पडली. परिणामी साखरेच्या निर्यातीचा दर २००० रुपयांवरून आज २२८० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अतिरिक्त साखरेमुळे जानेवारी २०१८ पासून जागतिक बाजारात साखरेचे दर ३५० डॉलर प्रतिटनावर आले. त्यानंतर दोन वर्ष दर घसरतच गेले. ऑक्‍टोबर २०१९ चा नवा हंगाम सुरू होताना भारताने साखर निर्यातीचे धोरण जाहीर करताच हे दर पुन्हा ३३० ते ३३५ डॉलरपर्यंत घसरले. मात्र जागतिक बाजारात साखरेचे उत्पादन ऐंशी लाख टनांनी घटणार आहे. ब्राझील, भारत, थायलंडच्या साखर उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे नव्या वर्षात आंतरराष्ट्रीय दर गोड वळणावर आले आहेत. यामुळे भारतातील कारखान्यांना साखर निर्यातीची संधी उपलब्ध होणार आहे.  

video : धनंजय मुंडे म्हणतात, गड, गादी नि महंतांपेक्षा कोणीही मोठं नाही 

देशात हंगाम सुरू होताना १४२ लाख टनांचा प्रचंड साखर साठा शिल्लक होता. त्यामुळे केंद्र सरकारने ६० लाख टन साखर निर्यातीचा निर्णय घेत प्रतिक्विंटल १०४० रुपये अनुदानही जाहीर केले. देशातील सर्वच कारखान्यांकडे साखरेचे साठे पडून होते आणि शेतकऱ्यांना एफआरपी देणे आवश्‍यक होते. यामुळे कारखान्यांनी २००० ते २०५० रुपये प्रतिक्विंटल दर असतानाही निर्यात सुरू केली. देशांतर्गत बाजार ३१०० रुपये प्रतिक्विंटल असताना ही निर्यात तोट्याची होती. मात्र आता जागतिक दर ३६७ डॉलरपर्यंत गेले आहेत. तेलाच्या वाढत्या दरामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाची ७१.४५ पर्यंत घसरण झाली. त्यामुळेही निर्यातमूल्य वाढणार आहे. 

हेही वाचा - कुंभार व्यवसायावर "संक्रांत' 

सद्यःस्थितीत प्रतिक्विंटल २६०० रुपयांच्या आसपास निर्यातदर असून वाहतूक व कमिशन वजा जाता २२५० ते २२८० रुपये दर कारखान्यांना निर्यातदार देऊ करत आहेत. अनुदान मिळवून हा दर ३२५० ते ३२८० पर्यंत जातो. सद्यःस्थितीत २५ लाख टनांची निर्यात झाली असून आणखी ३५ लाख टन निर्यातीची संधी कारखान्यांना आहे.

घोडगंगा कारखान्याला निर्यातदारांनी आज २२८० रुपये प्रतिक्विंटल निर्यातदर देऊ केला आहे. तो २३०० रुपये झाला, तर अधिक चांगला दर ठरेल. देशांतर्गत व कारखान्यांचा साखरसाठा आगामी हंगामापर्यंत संपवला पाहिजे; अन्यथा व्याजाचा बोजा वाढत राहील.
- अशोक पवार, अध्यक्ष, घोडगंगा सहकारी साखर कारखाना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sugar rate increase