आयआयटीएन्सचा आयआयएमकडे ओढा आश्‍चर्यकारक: पिचाई

पीटीआय
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

भारतात शिक्षणाला मोठे महत्त्व आहे. मुलांचे पालक नेहमी या विषयावर बोलताना दिसतात. आपली ध्येये गाठण्यासाठी तरुणांनी धाडस करणे महत्त्वाचे असल्याचे पिचाई यांनी नमूद केले.

खडगपूर - आयआयटीतील तरुण वर्गाचा आयआयएमकडे वाढत असलेला ओढा आपल्यासाठी आश्‍चर्यकारक असल्याचे प्रतिपादन गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांनी केले.

खडगपूर आयआयटीमध्ये आयोजित एका चर्चासत्रात ते बोलत होते. पिचाई म्हणाले, "तुमच्या संपूर्ण करिअरमध्ये नियमांचे पालन करावे, यावर सर्वांचा विशेष भर असतो. जेव्हा तुम्ही शाळेत असता तेव्हा कॉलेजचा विचार करत असता, त्याचप्रमाणे आयआयटीला आल्यानंतर लगेच आयआयएमचा विचार सुरू होतो. याचे मला खूप आश्‍चर्य वाटते.'

भारतात शिक्षणाला मोठे महत्त्व आहे. मुलांचे पालक नेहमी या विषयावर बोलताना दिसतात. आपली ध्येये गाठण्यासाठी तरुणांनी धाडस करणे महत्त्वाचे असल्याचे पिचाई यांनी नमूद केले. 10 वर्षांनंतर आपण स्वतःला कोठे पाहाल, असा प्रश्न त्यांना विचारला असता. ''10 वर्षे हा मोठा काळ आहे. मलाही माहिती नाही मी कोठे असेल. मात्र, अशा गोष्टी तयार करेन की, त्याचा वापर होईल,'' असे पिचाई यांनी सांगितले.

लेक्‍चरला दांड्या मारल्या
पिचाई यांनी खडगपूर आयआयटीतून 1993 मध्ये बी. टेक. ही पदवी घेतली आहे. आपण इतरांप्रमाणे त्या वेळी लेक्‍चर बंक करायचो. रात्री उशिरापर्यंतच्या जागरणाने अनेकदा सकाळी असणारे क्‍लास बुडायचे, असे पिचाई यांनी सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Web Title: Sundar Pichai is back in his campus after 23 years