बांगलादेशमधून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी "इन्फा रे' यंत्रणा

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जून 2017

"इन्फ्रा रे' यंत्रणा बसविण्यासाठी प्रतिकिलोमीटर 25 ते 30 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्‍यकता असली तरी नैसर्गिक स्थितीमुळे मजबूत कुंपण घालणे शक्‍य नसलेल्या सर्व ठिकाणी टप्प्यांटप्प्यांत ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे

कोलकता - पश्‍चिम बंगालमधील सुंदरबन आणि बांगलादेशमधील सीमेवरून होणारी घुसखोरी आणि तस्करी रोखण्यासाठी लवरकच या सीमेवर "इन्फ्रा रे' यंत्रणा आणि सेन्सर असलेले खांब बसविण्यात येणार आहेत.

या सीमेवर घनदाट जंगल आणि नदीप्रदेश असल्याने घुसखोरीचे प्रमाण अधिक आहे. या ठिकाणी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) "इन्फ्रा रे' आणि सेन्सर असलेले खांब बसविले आहेत. पावसाळा संपताच ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने घुसखोरीला दिलेले हे प्रत्युत्तर असल्याचे "बीएसएफ'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सुंदरबन आणि बांगलादेशमधील तीन ते चार किलोमीटर लांबीच्या सीमेवर प्रथम या प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे. पुढील तीन महिन्यांत ही यंत्रणा सुरू होऊन डिसेंबरपर्यंत त्याची चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास जानेवारी 2018 पर्यंत ही यंत्रणा सीमेवर कायमस्वरूपी बसविण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. "इन्फ्रा रे' यंत्रणा बसविण्यासाठी प्रतिकिलोमीटर 25 ते 30 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्‍यकता असली तरी नैसर्गिक स्थितीमुळे मजबूत कुंपण घालणे शक्‍य नसलेल्या सर्व ठिकाणी टप्प्यांटप्प्यांत ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. भारत आणि बांगलादेशमधील सीमा 4,096 किमी लांबीची असून, यातील 2,216.7 किमीचा पट्टा पश्‍चिम बंगालला लागून आहे. यापैकी 300 किमीची सीमा ही दलदल आणि नदी प्रदेश असलेल्या सुंदरबनला लागून आहे. अशा कठीण वातावरणात बीएसएफचे जवान गस्त घालत असतात.

यंत्रणा कशी काम करणार?
"इन्फ्रा रे' आणि सेन्सर बसविलेल्या खांबांवर उपग्रहावर आधारित यंत्रणेद्वारे नजर ठेवली जाणार आहे. ही यंत्रणा दाट अंधारात आणि धुक्‍यातही काम करते. घुसखोरी झाल्यास सेन्सरद्वारे संदेश जाऊन जवानांना सावध राहण्यास मदत होणार आहे. बांगलादेशला लागून असलेल्या सीमेवर घुसखोरी करत दहशतवादी भारतात येण्याचा प्रयत्न करण्याची शक्‍यता असल्याचा अहवाल केंद्र सरकारला मिळाल्याने त्यांनी तातडीने ही सीमा भक्कम करण्यासाठी हालचाल सुरू केली आहे.

Web Title: Sunderbans to set up infra-ray pillars to keep infiltrators at bay