सर्वसमावेशक प्रकल्पांना पाठिंबा - नरेंद्र मोदी 

 Support for comprehensive projects says modi
Support for comprehensive projects says modi

क्विंगडो - शेजारी देशांबरोबरच्या दळणवळणाला भारताने प्राधान्य दिले आहे. शेजारी देशांना जोडणाऱ्या अशा प्रकारच्या शाश्वत आणि प्रभावी प्रकल्पांचे आम्ही स्वागतच करतो. मात्र, असे मोठे प्रकल्प उभे करताना प्रादेशिक एकात्मता आणि देशांच्या सार्वभौमत्वाचा सन्मान केला जावा, अशी अपेक्षा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली. चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटीव्ह (बीआरआय) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा थेट उल्लेख न करता सर्वसमावेश प्रकल्पांना भारताचे पूर्ण पाठिंबा असले, असे ही मोदी यांनी स्पष्ट केले. 

चीनमधील किंगडाओ शहरात आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) वार्षिक परिषदेमध्ये बोलताना मोदी यांनी वरील मत मांडले. मोदी म्हणाले, की नागरिकांची सुरक्षा (एस), आर्थिक विकास (ई), विभागातील दळणवळण (सी), एकता (यू), सार्वभौमत्व व एकात्मतेचा सन्मान (आर) आणि पर्यावरणाचे रक्षण (इ) या शब्दांपासून "सेक्‍युअर' असा शब्द तयार होतो. 

दहशतवादासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, की अफगाणिस्तान हे याबाबतचे दुर्दैवी उदाहरण आहे. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी उचललेल्या धाडसी पावलांचा या विभागातील इतर देश आदर करतील अशी मला आशा आहे. दळणवळणासाठीच्या मोठ्या प्रकल्पांना भारताने सदैव पाठिंबा दिला आहे. आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण कॉरिडॉर प्रकल्प, चबहार बंदर आणि अशगाबात करार ही त्याची उदाहरणे आहेत. 

भारत भूमिकेवर ठाम 
चीनचे अध्यक्ष शी जिनपींग यांच्या महत्त्वाकांक्षी बीआरआय प्रकल्पावर भारताकडून अनेकदा टीका झाली आहे. याचाच भाग असलेला चीन पाकिस्तान आर्थिक क्षेत्र हा प्रकल्प पाकव्याप्त काश्‍मीरमधून (पीओके) जातो. आपल्या सार्वभौमत्वाला बाधा निर्माण करणाऱ्या प्रकल्पाला विरोध कायम राहील, असे भारताकडून वारंवार सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर चीनचे अध्यक्ष जिनपींग यांच्या उपस्थितीत मोदी यांनी आपल्या भाषणात अप्रत्यक्षपणे भारताची भूमिका पुन्हा एकादा मांडल्याचे मानले जाते. भारत वगळता "एससीओ'च्या इतर सर्व सदस्य देशांनी चीनच्या "बीआरआय'ला पाठिंबा दर्शविला असून, त्यात रशिया, पाकिस्तान आणि इरानचाही समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com