दाऊद इब्राहिमची मालमत्ता जप्त करा : सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने मुंबईत बेकायदेशीरपणे कोट्यवधींची संपत्ती गोळा केली आहे, त्याची ही संपत्ती जप्त करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आज (शुक्रवार) दिले.

नवी दिल्ली : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने मुंबईत बेकायदेशीरपणे कोट्यवधींची संपत्ती गोळा केली आहे, त्याची ही संपत्ती जप्त करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आज (शुक्रवार) दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे दाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

supreme court

मुंबईतील नागपाडामध्ये दाऊदची कोट्यवधींची संपत्ती आहे. ही संपत्ती त्याची बहिण हसीना आणि त्याची आई अमीना यांच्या नावावर आहे. दाऊदने मिळवलेली ही संपत्ती बेकायदेशीरपणे गोळा केली होती, अशी माहिती तपास यंत्रणांना मिळाली. त्यानंतर अमीना आणि हसीना पारकरने संपत्ती जप्त करण्याच्या निर्णयाला न्यायालायात आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला. मात्र, ही याचिका दाखल केलेल्या हसीना आणि अमीना या दोघींचाही मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, 1993 साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊद देश सोडून पळून गेला होता आणि त्यानंतर संबंधित विभागांनी त्याची संपत्ती जप्त करण्याच्या कारवाईला सुरवात केली होती. त्यानंतर हसीना आणि अमीना यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत संपत्ती जप्त करण्याच्या नोटीसला आव्हान देण्यासाठी वेळ देण्यात यावा, अशी मागणी केली होती. 
 

Web Title: Supreme Court orders Centre to seize Dawood Ibrahim properties in Mumbai