भाजपला झटका; उद्याच बहुमत सिद्ध करावे लागणार!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 मे 2018

काँग्रेसतर्फे अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश ऐतिहासिक असल्याचे ते म्हणाले. बहुमत सिद्ध होईपर्यंत मुख्यमंत्री येडियुरप्पा कोणताही निर्णय घेऊ शकत नाही तसेच तोपर्यंत राज्यपाल अँग्लो इंडियन सदस्याची नेमणुकही करु शकत नाही असा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याची सिंघवी यांनी माहिती दिली.

नवी दिल्ली : कर्नाटकातील सत्तासंघर्षावर उद्या (शनिवार) संध्याकाळी 4 वाजता बहुमत चाचणी घेण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले. भाजप यासाठी तयार नव्हते. बहुमत चाचणीसाठी आणखी वेळ दिला जावा यासाठी भाजप तर्फे युक्तीवाद करण्यात आला मात्र न्यायलयाने त्यास स्पष्ट नकार देत उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. गोपनिय पद्धतीने मतदान घेण्यात येऊ नये असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी दिले.

कर्नाटकात सत्तास्थापनेविरोधात काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेवर आज (ता. 18) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. कर्नाटकमध्ये राज्यपालांनी बी. एस. येडियुरप्पांना सत्तेसाठी पाचारण केल्यामुळे बुधवारी(ता.16) मध्यरात्री सर्वोच्च न्यायालय गाठलेल्या काँग्रेसच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांनी सुनावणी करत येडियुरप्पा यांचा शपथविधी न रोखण्याचा निर्णय दिला होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी आज(शुक्रवार) सकाळी साडेदहा वाजता सर्वोच्च न्यायालयात झाली. न्या. शरद बोबडे, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. के. सिकरी यांच्या खंडपीठापुढे कोर्ट नंबर ६ मध्ये ही सुनावणी झाली.

काँग्रेसतर्फे अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश ऐतिहासिक असल्याचे ते म्हणाले. बहुमत सिद्ध होईपर्यंत मुख्यमंत्री येडियुरप्पा कोणताही निर्णय घेऊ शकत नाही तसेच तोपर्यंत राज्यपाल अँग्लो इंडियन सदस्याची नेमणुकही करु शकत नाही असा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याची सिंघवी यांनी माहिती दिली. राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाला निमंत्रण द्यावे की बहुमत असलेल्या आघाडीला यावरही येत्या काळात सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार असल्याचे सिंघवी यांनी सांगितले.

दरम्यान भाजपने काँग्रेस व जेडीएसच्या आमदारांना मंत्रीपदाची व 100 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप कुमारस्वामी यांनी दोन दिवसांपुर्वी केला होता. त्यानंतर काँग्रेस-जेडीएसने आपल्या सगळ्या आमदारांना अज्ञात स्थळी पाठवले आहे. 
 

Web Title: Supreme Court orders floor test to be held at 4pm tomorrow