कर्नाटकचे 'नाटक' पहाटेपर्यंत रंगले सर्वोच्च न्यायालयात

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 मे 2018

काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेवर आज पहाटे सव्वादोनच्या सुमारास सुरवात झाली. न्या. शरद बोबडे, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. के. सिकरी यांच्या खंडपीठापुढे कोर्ट नंबर ६ मध्ये सुनावणी झाली.

नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये राज्यपालांनी बी. एस. येडियुरप्पांना सत्तेसाठी पाचारण केल्यामुळे मध्यरात्री सर्वोच्च न्यायालय गाठलेल्या काँग्रेसच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांनी सुनावणी करत येडियुरप्पा यांचा शपथविधी न रोखण्याचा निर्णय दिला. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या (शुक्रवार) सकाळी साडेदहा वाजता होणार असल्याचे सांगितले.

राज्यपालांनी तसा औपचारिक निर्णय केल्यास एकतर न्यायालयात किंवा राष्ट्रपतींकडे दाद मागणार असा स्पष्ट इशारा काँग्रेसने दिला. भाजपला बहुमत सिद्ध करायला अधिक वेळ मिळू शकतो आणि त्यातून घोडेबाजार होण्याची कॉंग्रेसला चिंता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने "मन की बात अब धन की बात होनेवाली है,' अशी टिप्पणीही केली होती. अखेर काँग्रेसने रात्री सर्वोच्च न्यायालय गाठले. काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष दलाच्या सर्व 117 आमदारांच्या सह्यांचे पत्र दिले आहे. शिवाय सर्व आमदारांच्या प्रत्यक्ष हजेरीची तयारी दर्शविली आहे. असे असताना राज्यपालांनी भाजपला संधी दिली असा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेवर आज पहाटे सव्वादोनच्या सुमारास सुरवात झाली. न्या. शरद बोबडे, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. के. सिकरी यांच्या खंडपीठापुढे कोर्ट नंबर ६ मध्ये सुनावणी झाली. याचिकेवर युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने येडियुरप्पा यांना 15 आणि 16 तारखेला जी पत्रे राज्यपालांना सादर केली आहेत ती न्यायालयात सादर करावी लागणार आहेत. आता या प्रकरणावर शुक्रवारी सकाळी 10.30 ला पुन्हा सुनावणी होणार आहे. आज पहाटे 2.15 ते पहाटे 5.30 पर्यंत सुनावणी सुरु होती. यापूर्वी दहशतवादी याकूब मेमनच्या फाशीवर पहाटेपर्यंत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती.

Web Title: Supreme Court In Overnight Hearing Says Won't Stop Yeddyurappa Swearing