'निर्भया'ला अखेर न्याय; चौघांची फाशी कायम 

टीम ई सकाळ
शुक्रवार, 5 मे 2017

सर्वोच्च न्यायालयाने 12 डिसेंबर 2012 च्या त्या घटनेचा आढावा घेताना म्हटले, की हिवाळ्यातील त्या थंड रात्री आपले विश्व उध्वस्त होणार आहे, याची किंचितशीही कल्पना तिला नव्हती...आरोपींनी तिला आणि तिच्या सहकाऱयाला मरेस्तोवर मारहाण केली, त्यांच्या अंगावर बस घालण्याचा प्रयत्न केला, त्यांना लुटले आणि लुटीचा माल आपापसात वाटून घेतला. लोखंडी सळई खुपसून तिचे आतडे ओढून काढले. कपड्यांच्या चिंथ्या केला. तिला लुटले. एखाद्या जनावरासारखे तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. या घटनांमुळे हा सामूहिक बलात्कार दुर्मिळातील दुर्मिळ (rarest of rare) गुन्हा ठरला आहे. 

नवी दिल्ली : अवघ्या देशभर गाजलेल्या 'निर्भया' सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) कायम ठेवली. 

'घृणास्पद आनंद मिळविण्यासाठी त्यांनी तिचा वस्तूसारखा वापर केला. तिच्या आत्मसन्मानाशी त्यांनी सैतानी प्रवृत्तीने खेळ केला,' असे सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे. 'या स्वरुपाच्या गुन्ह्याने सामाजिक विश्वास उध्वस्त झाला आणि कौर्याने कल्पनाशक्तीची सीमाही ओलांडली,' असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले. 

सर्वोच्च न्यायालयाने 12 डिसेंबर 2012 च्या त्या घटनेचा आढावा घेताना म्हटले, की हिवाळ्यातील त्या थंड रात्री आपले विश्व उध्वस्त होणार आहे, याची किंचितशीही कल्पना तिला नव्हती...आरोपींनी तिला आणि तिच्या सहकाऱयाला मरेस्तोवर मारहाण केली, त्यांच्या अंगावर बस घालण्याचा प्रयत्न केला, त्यांना लुटले आणि लुटीचा माल आपापसात वाटून घेतला. लोखंडी सळई खुपसून तिचे आतडे ओढून काढले. कपड्यांच्या चिंथ्या केला. तिला लुटले. एखाद्या जनावरासारखे तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. या घटनांमुळे हा सामूहिक बलात्कार दुर्मिळातील दुर्मिळ (rarest of rare) गुन्हा ठरला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर करताच कोर्टाच्या आवारात टाळ्यांचा कडकडाट झाला. दिल्ली पोलिसांनी केलेल्या तपासाबद्दल न्यायालयाने समाधान व्यक्त केले. हा तपास सर्वंकष होता, असे मत न्यायालयाने मांडले. 

देश पेटला...
23 वर्षे वयाच्या तरूणीवर दिल्लीत सामूहिक बलात्कार झाल्यानंतर देशभर प्रक्षोभ उसळला होता. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायदे अत्यंत कडक करण्याची मागणी देशाच्या सर्व भागातून आणि सर्व स्तरातून झाली होती. एकूण सहा नराधमांनी दक्षिण दिल्लीत चालत्या बसमध्ये बलात्कार केला आणि संबंधित तरूणीच्या सहकाऱयाला आणि तिला बसमधून फेकून दिले. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱया त्या तरूणीचे देशभरातील माध्यमांनी 'निर्भया' असे नामकरण केले. निर्भयाला सर्वोत्तम उपचारासाठी सिंगापूरच्या रूग्णालयात विशेष विमानातून नेण्यात आले. तथापि, 29 डिसेंबर 2012 रोजी तिची झुंज अपयशी ठरली आणि तिचा मृत्यू झाला. 

कायदा बदलला... 
या घटनेनंतर 2013 मध्ये बलात्कार विरोधी कायदा, ज्याचे नामकरण नंतर 'निर्भया कायदा' असे झाला, अस्तित्वात आला. नव्या कायद्याने बलात्काराच्या घटनेला भारतीय दंडविधान संहिता 376 (अ) अंतर्गत फाशीची शिक्षा देणे शक्‍य झाले. नव्या कायद्यानुसार, बलात्काराच्या घटनेत संबंधित पीडितेचा मृत्यू झाल्यास अथवा तिला कायमचे अपंगत्व आल्यास आरोपीला किमान 20 वर्षे शिक्षा किंवा फाशी देता येते. वीस वर्षांची शिक्षा आजन्म कारावासात बदलता येते. 

मॅरेथॉन सुनावणी...
सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. दीपक मिश्रा यांनी 27 मार्च 2017 रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली. तब्बल एक वर्षभर रोजच्या रोज या प्रकरणाची सुनावणी झाली. ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथ्रा यांनी दिल्ली पोलिसांच्यावतीने युक्तीवाद करताना आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. कोर्टाने नेमलेले त्रयस्थ वकील राजू रामचंद्रन यांनी मात्र फाशीच्या शिक्षेपेक्षा आजन्म कारावासाची शिक्षा देण्याची मागणी कोर्टाकडे केली. या खटल्यामध्ये कनिष्ठ न्यायालयाने फौजदारी दंडप्रक्रिया संहितेच्या कलम 235 चे पालन केले नसल्याचा युक्तीवाद बचावपक्षाने केला होता. या कलमानुसार, कोर्टाने प्रत्येक आरोपीची स्वतंत्र सुनावणी घेणे आवश्‍यक होते. सर्वोच्च न्यायालयाने प्रथमदर्शनी या कलमाचे पालन न झाल्याचे मान्यही केले होते. तथापि, अंतिम निकालात कोणताही बदल सर्वोच्च न्यायालयाने केलेला नाही. 

राजधानी दिल्लीतल्या रस्त्यांवर माणसांच्या रुपात पशू वावरतात, याचा प्रत्यय देणारी भीषण घटना 16 डिसेंबर 2012 रोजी घडली. 23 वर्षे वयाच्या तरुणीवर नराधमांनी चालत्या बसमध्ये बलात्कार केला आणि तिच्या शरीराचे हालहाल करून रस्त्यावर फेकून दिले. त्यानंतर देशभर उसळलेला संताप, रस्त्यावर उतरलेली तरूणाई आणि कायद्यांमध्ये झालेला बदल अभूतपूर्व होता. 'निर्भया' सामूहिक बलात्कार प्रकरणाकडे अवघ्या देशाचे लक्ष होते. या प्रकरणाचा घटनाक्रम असा : 

 • 5 मे, 2017 : सर्वोच्च न्यायालयाने निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना फाशीची शिक्षा कायम ठेवली. 
 • 27 मार्च, 2017 : वर्षभर सुनावणी घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल राखून ठेवला. 
 • 6 मार्च, 2017 : सर्व आरोपींनी कोर्टात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर केले. 
 • 3 फेब्रुवारी, 2017 : आधीच्या सुनावणीमध्ये कायदेशीर प्रक्रिया पाळल्या गेल्या नसल्याचा आक्षेप बचाव पक्षाने केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेचा मुद्दा पुन्हा तपासून पाहण्याचा निर्णय घेतला. 
 • 6 जानेवारी, 2017 : या प्रकरणातील आरोपींना कमी शिक्षा व्हावी, यासाठी बचावपक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 
 • 28 नोव्हेंबर, 2016 : ज्येष्ठ वकील आणि ऍमिकस क्‍युरी संजय हेगडे यांनी या प्रकरणातील पुराव्यांच्या विश्वासार्ह्यतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 
 • 16 सप्टेंबर, 2016 : दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर मिझोरामला बदली केलेल्या दिल्लीच्या माजी पोलीस उपायुक्त छाया शर्मा यांनी सुनावणीस हजेरी लावली. 
 • 2 सप्टेंबर, 2016 : ऍड. एम. एल. शर्मा यांनी आपले म्हणणे पूर्ण केले. 
 • 29 ऑगस्ट, 2016 : पोलिसांनी पुराव्याशी छेडछाड केल्याचा आरोप झाल्याने कोर्टात नाट्य रंगले. 
 • 8 एप्रिल, 2016 : ज्येष्ठ वकील राजू रामचंद्रन आणि संजय हेडगे यांची कोर्टाने ऍमिकस क्‍युरी (त्रयस्थ वकील) म्हणून नियुक्ती केली. 
 • 3 एप्रिल, 2016 : तब्बल 19 महिन्यांनंतर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्या. गोपाळ गौडा आणि न्या. कुरियन जोसेफ यांच्या खंडपीठासमोर पुन्हा सुनावणी सुरू झाली. 
 • 18 डिसेंबर, 2015 : सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या सुटकेला स्थगिती देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. तीन वर्षे बालसुधार गृहात राहिल्यानंतर आरोपीची सुटका झाली. 
 • 15 मार्च, 2014 : कोर्टाने निःपक्षपाती सुनावणी घेतली नसल्याचा आरोपींनी आक्षेप घेतल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली. 
 • 13 मार्च, 2014 : कनिष्ठ कोर्टाने दिलेला निकाल दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवा क्षेत्रपाल आणि न्या. प्रतिक्षा राणी यांच्या खंडपीठाने कायम ठेवला. 
 • 13 सप्टेंबर, 2014 : अतिरिक्त सत्र न्यायाधिश योगेश खन्ना यांनी उर्वरित चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. 
 • 29 जानेवारी, 2013 : सर्वोच्च न्यायालयाने केसची सुनावणी अन्यत्र हलविण्यासंदर्भातील याचिका निकालात काढली. 
 • 31 ऑगस्ट, 2013 : बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवरील सुनावणी बाल गुन्हेगार न्याय मंडळाचे मुख्य जिल्हा न्यायदंडाधिकारी गीतांजली गोयल यांच्यासमोर झाली. बालगुन्हेगारावरील आरोप सिद्ध झाल्याने त्याला तीन वर्षे सुधारगृहात पाठविण्याचा निर्णय कोर्टाने दिला. 
 • 11 मार्च, 2013 : सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंह याने तिहार जेलमध्ये आत्महत्या केली. 
 • 16 डिसेंबर, 2012 : चित्रपट पाहून रात्री उशीरा घरी परतत असलेल्या 23 वर्षीय मुलीवर चालत्या बसमध्ये सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला. यात 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलाचाही समावेश होता. या अमानूष मारहाणीत जखमी झालेल्या त्या मुलीचा 29 डिसेंबर 2012 रोजी सिंगापूरच्या रुग्णालयात मृत्यू झाला.
Web Title: Supreme Court upholds death sentence to four accused in Nirbhaya gang rape case