पैसे न भरल्यास रॉय यांनी तुरुंगात जावे- सर्वोच्च न्यायालय 

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

इतर आरोपींच्या तुलनेत रॉय यांचे आतापर्यंत भरपूर लाड पुरविले आहेत अशी टीका करत न्यायालयाने मुदतवाढ नाकारली. सहारा समुहाकडे व्याजासकट अद्याप 37,000 कोटी रुपयांचे दायित्व आहे.

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना 600 कोटी रुपये जमा करण्यासाठी मुदतवाढ नाकारली आहे. रॉय यांनी 6 फेब्रुवारीपर्यंत सेबी-सहारा खात्यात 600 कोटी रुपये जमा करावेत अन्यथा तुरुंगात जावे असे न्यायालयाने म्हटले आहे. 

नोटाबंदीचा निर्णय आणि आर्थिक मंदीमुळे ही रक्कम जमा करण्यास उशीर होत असल्याचे कारण रॉय यांनी दिले आहे. मात्र, इतर आरोपींच्या तुलनेत रॉय यांचे आतापर्यंत भरपूर लाड पुरविले आहेत अशी टीका करत न्यायालयाने मुदतवाढ नाकारली आहे. सरन्यायाधीश टी एस ठाकूर आणि न्यायमुर्ती रंजन गोगोई आणि एके सिक्री यांच्या खंडपीठाने रॉय यांना दोन महिन्यांमध्ये 1,000 कोटी रुपये जमा करण्याची मुदत दिली होती. परंतु त्यानंतर ही रक्कम कमी करुन 6 फेब्रुवारीपर्यंत 600 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. 

सहारा समुहाकडे व्याजासकट अद्याप 37,000 कोटी रुपयांचे दायित्व आहे. कंपनीने आतापर्यंत गुंतवणूकदारांचे 18,000 कोटी रुपयांचे फेडले आहेत. सुब्रतो रॉय त्यांच्या आईच्या निधनानंतर मे महिन्यापासून पॅरोलवर तुरुंगाबाहेर आहेत.
 

Web Title: Supreme Court Warns Subrata Roy