नमाज आणि सूर्यनमस्कार सारखेच - योगी आदित्यनाथ

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मार्च 2017

नमाज आणि सूर्यनमस्कारामध्ये बरेचसे साम्य आहे. नमाज व सूर्यनमस्कार करतानाच्या शारीरिक स्थितीत (पोश्‍चर) खूप साम्य आहे. दोन्ही धर्मांतील हे सौहार्दाचे उत्तम उदाहरण आहे.

लखनौ - सूर्यनमस्कार आणि नमाज यांच्यात बरेसचे साम्य आहे. जे लोक योगाला विरोध करीत आहेत त्यांना धार्मिक मुद्यांवरून समाजात फूट पाडायची आहे, असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले. 

ते म्हणाले, "नमाज आणि सूर्यनमस्कारामध्ये बरेचसे साम्य आहे. नमाज व सूर्यनमस्कार करतानाच्या शारीरिक स्थितीत (पोश्‍चर) खूप साम्य आहे. दोन्ही धर्मांतील हे सौहार्दाचे उत्तम उदाहरण आहे. मात्र ज्यांचा योगावर विश्‍वास नाही ते लोक समाजात जातीधर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत.'' 

येथील तीन दिवसांच्या यूपी योग महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा त्यांचा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता. ते म्हणाले, "सूर्यनमस्कारात जितकी आसने आहेत त्यात जी प्राणायामाची क्रिया आहे ती मुस्लिम बांधवांच्या नमाजपठणाशी मिळतीजुळती आहेत. मात्र याला एकत्र करण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. पूर्वी योगाकडे धार्मिक दृष्टीने पाहिले जात होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला जागतिक स्तरावर नेऊन पोचविले. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.'' 
राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरियन यांनीही गेल्या रविवारी योगाच्या समथनार्थ मतप्रदर्शन केले होते. 

"शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश करावा, त्याचा व्यक्तित्त्व विकासासाठी मोठा उपयोग होतो,'' असे मत कुरियन यांनी व्यक्त केले होते.

Web Title: Surya Namaskar similar to Namaz: Uttar Pradesh CM Yogi Adityanath Read more at: http://economictimes.indiatimes.com/articleshow/57897738.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst