थरुर, पाकिस्तानविरोधातील ठरावाचा "ड्राफ्ट' बनवून द्या: स्वराज

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 एप्रिल 2017

थरुर यांनी सभागृहामधील कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची परवानगी घेऊन तत्परतेने हा ठराव तयार करण्यासाठी सरकारला मदत केली. आपल्या सर्वांच्याच दृष्टिकोनामधून हा अत्यंत संवेदनशील विषय आहे, अशी भावना थरुर यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना व्यक्‍त केली

नवी दिल्ली - भारतीय नागरिक असलेल्या कुलभूषण जाधव यांना पाककडून फाशी देण्यात येत असल्याच्या घटनेविरोधात संसदेच्या दोन्ही सभागृहांत राजकीय एकी पहावयास मिळाली. जाधव यांना देण्यात येणाऱ्या फाशीविरोधात संसदेकडून संमत करण्यात येणारा ठराव कॉंग्रेस नेते शशी थरुर यांनी तयार (ड्राफ्ट) करावा, अशी विनंती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज (मंगळवार) त्यांना केली.

लोकसभेमध्ये जाधव यांच्या फाशीसंदर्भातील भूमिका स्पष्ट केल्यानंतर स्वराज थरुर यांना भेटल्या. थरुर यांनी हा ठराव तयार करावा, अशा आशयाचे आवाहन स्वराज यांनी त्यांना केले. यावर थरुर यांनी सभागृहामधील कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची परवानगी घेऊन तत्परतेने हा ठराव तयार करण्यासाठी सरकारला मदत केली. आपल्या सर्वांच्याच दृष्टिकोनामधून हा अत्यंत संवेदनशील विषय आहे, अशी भावना थरुर यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना व्यक्‍त केली.

याआधीही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थरुर यांना मुंबई येथे घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा (26/11) मुख्य सूत्रधार झकिउर रेहमान लखवी याचा निषेध करणारे निवेदन तयार करण्याची विनंती गेल्या वर्षी (2016) केली होती. जाधव यांच्या फाशीच्या प्रकरणामधूनही दहशतवादाविरोधात संसदेमध्ये सर्व राजकीय पक्षांमध्ये एकी असल्याचे दिसून आले.

Web Title: Sushma Swaraj Asks Shashi Tharoor To Draft Response Against Pakistan