साऱ्या देशाचे डोळे ओले करून सुषमा स्वराज अनंतात विलीन

साऱ्या देशाचे डोळे ओले करून सुषमा स्वराज अनंतात विलीन

नवी दिल्ली - प्रखर वक्‍त्या व हजारो भारतीयांची विदेशातून मुक्तता करणाऱ्या प्रभावी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (वय 67) यांना आज देशाने साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. दिल्लीतील लोधी रोड स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत स्वराज यांच्यावर आज दुपारी चार वाजून चाळीस मिनीटानी अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू व संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासह हजारो उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रूंनी गर्दी केली होती. 

स्वराज यांचे काल (ता.06) रात्री ह्रुदयविकाराच्या झटक्‍याने अकस्मिक निधन झाले. त्यांचे पार्थिव जंतर मंतर येथील धवन दीप इमारतीतील त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) तेथे विविध मान्यवरांसह पंतप्रधान, अडवानी, नायडू, राजनाथसिंह, कॉंग्रेस आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहूल गांधी, भाजप कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, बसपा प्रमुख मायावती, सपा नेते मुलायमसिंह व रा गोपाल यादव , विरोधी पक्षनेते गुलाम नबी आजाद, रामदेव बाबा, भाजपचे मंत्री व खासदार आदींनी अंत्यदर्शन घेऊन त्यांचे पती स्वराज कौशल व कन्या बासुरी यांचे सांत्वन केले. डोळ्यात अश्रूंची गर्दी झालेले मोदी यांना तर स्वराज यांचे अंत्यदर्शन घेतल्यावर काही क्षण शब्दच सुचत नसल्याचे चित्रीकरणातून स्पष्ट दिसते. अडवानी यांच्यासह अनेकांची स्थितीही यापेक्षा वेगळी नव्हती. ज्या हजारो सर्वसामान्याची स्वराज यांनी विदेशात मदत केली त्यापैकी अनेकजण दिल्लीत आले होते. 

सकाळी साडेअकराच्या सुमारास स्वराज यांचे पार्थिव दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजप मुख्यालयात जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यास रवाना झाले. स्वराज यांना सुवासिनी असताना मृत्यू आल्याने त्यांना हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार लाल साडी, सिंदूर व लाल बांगड्या परिधान करण्यात आल्या होत्या. दुपारी बारा वाजता भाजपाध्यक्ष अमित शहा, नड्डा यांनी त्यांच्या पार्थिवावर भाजपचा झेंडा पांघरला. त्यानंतर नागरिकांसाठी अंत्यदर्शन खुले झाले. स्वराज यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना व नंतरही ज्या सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला त्यांतील हजारो लोक यावेळी साश्रू नयनांनी उपस्थित होते. असेच दृश्‍य लोधी रोड स्मशानभूमीच्या परिसरातही होते. स्वराज यांच्या जयजयकाराच्या तसेच 'जब तक सूरज चांद रहेगा, दीदी तेरा नाम रहेगा' अशा घोषणांनी आसमंत दणाणला होता.

दुपारी सव्वाचारला स्वराज यांची अंतिम यात्रा सुरू झाली. साडेचारला पार्थिव स्मशानभूमीत पोहोचले. बासुरी यांनी सारे धार्मिक विधी केल्यावर पंतप्रधान, अडवानी, नायडू, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला तसेच विविध देशांच्या राजदूतांनी अंत्यदर्शन घेतले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हरियाणाचे मनोहर लाल खट्टर, राजस्थानचे अशोक गेहलोत, त्रिपुराचे विल्पव देव या मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री व भाजप नेते मोठ्या संख्येने हजर होते. त्यानंतर स्वराज यांच्या इच्छेनुसार विद्युतदाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com